गोंदिया: भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेला युद्धाला शनिवारी सायंकाळी युद्ध विराम मिळाला असला तरीही भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे सैनिकांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांना त्वरित त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे सैनिक आपल्या कर्तव्यावर परतत आहे. अर्जुनी मोरगाव येथील एक जवान आपल्या कौटुंबिक विवाह सोहळ्या करिता आला होता.पण त्याला त्याच्या मुख्यालयातून परतीचा निरोप येताच त्याला विवाह सोहळा सोडून परतावे लागले.
अर्जुनी मोरगाव येथील प्रभाग क्रमांक ५ येथील रहिवासी असलेले आकाश ओमप्रकाश शहारे हा आपल्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्या साठी २६ दिवसांच्या रजेवर आला होता. पण भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे युद्धजन्यपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर त्याची रजा संपण्यापूर्वीच सैनिक मुख्यालयातून त्यांना तत्काळ हजर राहण्याचा निरोप आल्याने देश सेवेसाठी आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी मित्र परिवारचा निरोप घेऊन आकाश देशाच्या रक्षणार्थ निघाला. आकाश ओमप्रकाश शहारे (३२) हा २०१४ मध्ये सैन्य दलात रुजू झाला. सध्या तो हवालदार जीडी म्हणून २०५ कोब्रा बटालियन मध्ये कार्यरत आहेत.
बिहार राज्यातील गया येथे त्याचे मुख्यालय आहे. मेहुण्याच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी तो २६ दिवसांच्या रजेवर १८ एप्रिल रोजी गावाकडे आला होता. रविवार ११ मे रोजी रात्री ला आकाशच्या मेहुण्याचे लग्न आयोजित आहे. इकडे आकाश चे संपूर्ण कुटुंब लग्नाच्या धामधुमीत रममान असताना शुक्रवार ९ मे रोजी गया (बिहार) या मुख्यालयातून महत्त्वाचा परतीचा संदेश आला. त्वरित कर्तव्यावर रुजू होण्याची सूचना आकाशाला मिळाली. सूचना मिळताच” आधी लगीन कोंढाण्याचे ” म्हणत आकाश देशसेवेसाठी तत्परतेने शनिवार १० मे रोजी रात्री गावावरून गया जाण्यासाठी रवाना झाला.
माध्यमातून मिळत असलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी युद्धविराम दोन्ही पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती विविध वाहिन्यांवरून देण्यात येत असल्याचे आकाश ला सांगण्यात आले. पण माझ्या करिता मेव्हण्याच्या लग्नापेक्षा देशसेवा ही माझी प्राथमिकता आहे मला गया (बिहार) सेनेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी मुख्यालया कडून आलेले परतीचे आदेश हेच सर्वोतपरी आहेत. युद्ध विराम झाले असेल तर ठीकच आहे पण मला माझ्या मुख्यालयाचे आदेश महत्त्वाचे असल्याची माहिती आकाश शहारे यांनी जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांना दिली.