लोकसत्ता टीम
अकोला: नाफेडमार्फत हमीभावाने हरभरा खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. जिल्ह्यातील १८ हजारांवर शेतकऱ्यांनी नाफेडकडे नोंदणी केली. मात्र, बारदान्याअभावी हरभरा नाफेडची खरेदी प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. येत्या काही दिवसांमध्ये प्रक्रिया सुरळीत होणार असल्याची माहिती जिल्हा विपणन अधिकाऱ्यांनी दिली.
हरभऱ्याच्या शासकीय खरेदीला १४ मार्चपासून प्रारंभ झाला. केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये नाफेडद्वारा हरभरा खरेदी करण्यात येत आहे. शासनाने पाच हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र, खासगी बाजारात चार हजार २०० ते चार हजार ८०० रुपये क्विंटलप्रमाणे भाव दिला जात आहे. खासगी बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा नाफेडला हरभरा विक्री करण्याकडे कल आहे. नाफेडमार्फत आतापर्यंत सात हजार २८९ शेतकऱ्यांकडून एक लाख २६ हजार ८७२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली.
आणखी वाचा- सलग चौथ्या दिवशी चंद्रपूरच्या तापमानाने गाठला उच्चांक, ४२.८ अंश सेल्सिअसची नोंद
हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी वाढत असल्याने नाफेडकडून संथगतीने हरभरा खरेदी करण्यात येत होती. त्यातच आता बारदाना नसल्याने खरेदी थांबली आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा एकदा भर पडली. ऐन हंगामात हरभरा खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. नाफेडचे हरभरा खरेदीचे नियोजन कोलमडले. आगामी दोन ते तीन दिवसांत बारदाना उपलब्ध झाल्यावर नाफेडची खरेदी पूर्ववत होणार असल्याची माहिती आहे.