वाशीम : कुशल व रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर आयोजित करण्यात येत आहे. आज ३१ मे रोजी शहरातील राज्यस्थान आर्य कॉलेज येथे आयोजित केलेल्या शिबिराला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी पाठ फिरवली. त्यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी फिरकलेच नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

सरकारच्या वतीने जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत ६ मे ते ६ जून दरम्यान छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबईच्या विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाशीमच्या वतीने राजस्थान आर्य कॉलेज येथे ३१ मे रोजी सकाळी ९ : ३० वाजता छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकीला विमानतळावरून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या शिबीरात इयत्ता १० वी आणि १२ वी, पदविका, पदवीनंतर युवक-युवतींना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विविध रोजगाराच्या संधी, करीअर कसे निवडावे, व्यक्तीमत्व विकास तसेच स्पर्धा परीक्षेबाबत माहिती देण्यासाठी सदर शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खा. भावनाताई गवळी, खा. संजय धोत्रे, आ. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, आ. धिरज लिंगाडे, आ. लखन मलिक, आ. राजेंद्र पाटणी आदींची उपस्थिती राहणार होती. परंतु याकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली असून, इतरही लोकप्रतिनिधी फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशाला लोकप्रतिनिधींचीच उदासीनता असल्याचे दिसून येते.