वर्धा : राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर मग त्यांच्या खाते वाटपावर राज्याचे लक्ष लागून असते. पुढील उत्सुकतेचा टप्पा म्हणजे कोणता मंत्री कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार. त्यात पण चांगली रस्सीखेच सूरू होते. नाशिक व रायगडबाबत तसेच झाले. काही जिल्ह्यात पालकमंत्री पदाबाबत वाद सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पण पालकमंत्री नेमण्याचा अधिकार सर्वस्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो, हे सर्वच जाणतात. त्यातून काही मंत्र्याना दोन दोन जिल्ह्याची जबाबदारी पण मिळते. जसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर व अमरावती अशा दोन प्रांताचे विभागीय मुख्यालय असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आता आणखी एका मंत्र्यास दोन जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने १८ जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री जाहीर केले होते. त्यात प्रशासकीय कारणास्तव पालकमंत्री नियुक्तीत अंशता बदल करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती, असे सामान्य प्रशासन विभागाने नमूद करीत तसे बदल जाहीर केले आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांना आता भंडारा जिल्ह्याचे पण पालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तर भंडारा येथील विद्यमान पालकमंत्री संजय वामन सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आल्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.
पालकमंत्री डॉ. भोयर यांना अतिरिक्त पालकमंत्रीपद मिळण्याची बाब त्यांचे महत्व सिद्ध करणारी मानल्या जाते. जिल्ह्याच्या राजकारणात चार विधानसभेचे व एक विधान परिषदेचा असे पाच आमदार भाजपचेच आहेत. त्यात डॉ. भोयर यांची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोयर यांना मंत्रीपद तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त केल्याने भोयर यांची राजकीय विषश्वनियता चांगलीच वाढली. मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे भाजप वर्तुळ पाहू लागले. आता परत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करीत डॉ. भोयर यांच्यावर असलेल्या विश्वासावर परत शिक्कामोर्तब केल्याचे म्हटल्या जात आहे.
वर्धा येथील एका कार्यक्रमात बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलून गेले होते की मंत्री डॉ. भोयर हे सर्वांना घेऊन चालतात. पुढे भाजपचा विभागीय मेळावा सेवाग्राम येथे आयोजित करण्यात आला होता. त्याची जबाबदारी डॉ. भोयर यांच्यावरच टाकण्यात आली होती. ती यशस्वी पार पडल्याची पावती महसूलमंत्री बावनकुळे यांनी देऊन टाकली होती. आणखी एक बाब चर्चेत आली होती. मुख्यमंत्री फडणवीस हे मेळावा आटोपल्यावर वेळेवर पालकमंत्री भोयर यांना म्हणाले होते की पंकज, मला जरा घाई आहे. चल तूझ्या घरीच जेवून पुढे निघतो. हा भोयर यांच्या कार्य पद्धतीवर विश्वास टाकण्याचा प्रकार गत आठ महिन्यात अनेकवार घडल्याचे भाजप वर्तुळ बोलते.