नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आक्रमक पवित्रा घेत आहेत. समाजात शांतता नांदवी यासाठी शहरातील अनेक टोळ्यांवर मोक्का आणि प्रतिबंधात्मक कारवायांचा धडका त्यांनी लावला होता. आता शहरातील बंदुकांचे परवाने असणारे व्यक्ती पोलीस आयुक्तांच्या रडारवर आहे.आयुक्तांनी गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात २७ जणांचे बंदूक परवाने रद्द केले आहेत. गेल्या चार महिन्यात तब्बल १० जणांचा पिस्तुल परवाना रद्द केला आहे, हे विशेष.

उत्तरप्रदेश-बिहार राज्यानंतर महाराष्ट्रात अग्निशस्त्रांचा वापर केला जातो. मुंबईनंतर नागपुरात सर्वाधिक पिस्तुलांचा वापर झाल्याची नोंद पोलिसांकडे आहे. देशीकट्टे आणि विदेशी बनावटीचे पिस्तुलांचा वापर अनेक जण अवैधरित्या करतात. तसेच शहरात एकूण २ हजार ३८ जणांकडे पिस्तुल वापरण्याचा परवाना आहे.अनेकांना देखावा म्हणून पिस्तूल हवी असते. तर काहींना गरज नसतानाही बंदुकीचा परवाना काढावा वाटतो. काही जण पोलीस आयुक्तालय आणि पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करीत पिस्तूल परवाना काढतात. काहींवर गुन्हे दाखल असतानाही पिस्तूलचा परवाना काढला आहे. काही पिस्तूलधारकांनी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत, ते पोलीस ठाणे सोडून अन्य पोलीस ठाण्यातून गुन्हे दाखल नसल्याचे प्रमाणपत्र सादर करून आयुक्तांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा >>>गोंदिया : दोन चालकांच्या भांडणात ट्रेलर सुटला अन् थेट खासदाराच्या वाहनाला धडकला; पुढे काय झाले वाचा..

कायदेशीररीत्या बंदूक बाळगण्याचा परवाना असतानाही त्याच्याकडून भविष्यात गुन्हा घडण्याची शक्यता असणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील बंदुकांसह शस्त्राविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. एप्रिलपर्यंत, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत सुमारे १८१ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. ज्यात दोन बंदूकांचा समावेश होता. व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, सट्टेबाज, गुन्हेगार, हॉटेल व्यावसायी यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बंदुकांचा परवाना रद्द केला आहे. काही शस्त्र परवानाधारकाकडून बंदुकांच्या गोळ्या चालविण्यात आल्याची माहिती होती. तसेच पिस्तुलाचे छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करीत भितीदायक वातावरण निर्माण करून नियमांचे उल्लंघन केले होते. शस्त्राचा गैरवापर करण्याचे काही प्रकार समोर आले होते.

हेही वाचा >>>दक्षिण नागपुरात वीज संकट, कधीही पुरवठा खंडित होण्याचा धोका, काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंदुकांचा गैरवापर झाल्यामुळे काहींचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. अमितेश कुमार म्हणाले, कोणताही परवाना निलंबित करण्यापूर्वी कायद्यानुसार सर्व कायदेशीर औपचारिकता आणि सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. भविष्यात शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता, परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.