वर्धा : केवळ चूल व मूल एवढेच सीमित न राहता काही केले पाहिजे, ही भावना आता महिलांमध्ये वाढत असल्याचे त्यांच्या विविध उपक्रमातून दिसून येवू लागले आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात महिलांचा वाढता संचार हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल. पण पर्यावरण क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा सांभाळ आपल्या परीने करण्याचा प्रयत्न अनोखाच म्हणावा लागेल. हे त्यातलेच एक उदाहरण. सर्व गृहिणी. सुखवस्तू कुटुंबातून आलेल्या. पण त्यांचा हा विचार लोकांनी उचलून धरत त्यास प्रतिसाद पण दिला आहे.
१६ गृहिणी एकत्र आल्या. गुंज म्हणून संस्था स्थापन केली. असंख्य घरी वापरून टाकून दिलेल्या वस्तू असतात. कपडे, भांडी, खेळणी, पुस्तके, गृहपयोगी अन्य वस्तू पडून असतात. चांगल्या म्हणून फेकायची ईच्छा होत नाही आणि त्याचा वापर पण होत नाही. अशा वस्तूंचा पुन्हा वापर होत गेल्यास कचरा वाढणार नाही. वस्तू अधिकाधिक वापरल्या जाईल. गरजू व्यक्तीस अत्यंत कमी किंमतीत त्या उपलब्ध होणार असल्याने अश्या व्यक्तींना आनंद पण मिळेल, अशी या गृहिणींची भावना. ती मग प्रत्यक्षात उतरली.
समाज माध्यमातून आवाहन करण्यात आले आणि थोड्याच दिवसात उपयुक्त वस्तूंचा साठाच झाला. त्यात कपडे, खेळणी, महागड्या साड्या, ब्लँकेट, चादरी, वॉशिंग मशीन, मिक्सर व अन्य वस्तू जमा झाल्या. त्याचे महत्व रहावे व आलेला पैसा अन्य उपक्रमात लावता यावा म्हणून अत्यंत अल्प किंमतीत त्याची विक्री झाली. ४ हजाराची साडी २०० रुपयात मिळत असेल तर कोण नाही घेणार, असे गुंज संस्थेच्या हर्षा टावरी विचारतात. आठवड्याभारत सर्व वस्तू संपल्या. कामवाल्या, नर्सेस, अन्य श्रमजीवी अश्यांनी या वस्तू खरेदी केल्या. एवढेच नव्हे तर सोफा व काही महागड्या वस्तू चांगल्या स्थितीत पाहून मध्यमवर्गीय लोकांनी हातोहात या वस्तू नेल्या.
वर्धा : गुंज या संस्थेशी जुळालेल्या महिलांनी पर्यावरणाचा विचार करून उपक्रम राबवला. असंख्य घरात वापरून टाकून दिलेल्या वस्तू संकलित केल्यानंतर त्यांची अल्प किंमतीत विक्री केली. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.https://t.co/2jrmCKw8Ui#nagpur pic.twitter.com/Xq9sjPzJ5X
— LoksattaLive (@LoksattaLive) October 5, 2025
वस्तूंचा पुन्हा वापर व्हावा, कमी किंमतीत चांगल्या वस्तू गरजूस मिळाव्या, असा हेतू सफल झाल्याचे या गृहिणी असलेल्या पदाधिकारी सांगतात. प्लास्टिक वापर रोखण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. नवरात्रात मोठ्या शहरात लंगर लागतात. तेव्हा नाश्ता प्लास्टिक वाटीत किंवा पत्रावळीत दिल्या जातो. म्हणून या महिलांनी प्रसाद घेणाऱ्या भक्तांना प्लास्टिकमधून देऊच नये. त्यांना घरून भांडी आणण्यास सांगा, असे आवाहन दुर्गा मंडळास केले. अनेक मंडळानी ते स्वीकारत प्लास्टिक बंद केले, अशी माहिती आशा मुंदडा देतात.