यवतमाळ : जिल्ह्यात आठवडाभरापासून अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून आज रविवारी पहाटेपासून पावसाने रौद्ररूप धारण केल्याचे चित्र आहे. आज जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला. दुपारी यवतमाळसह दारव्हा, दिग्रस आदी भागात गारपीट झाली. यवतमाळ शहरात सौम्य स्वरुपाच्या गारा कोसळल्या तर दारव्हा तालुक्यातील गणेशपूर येथे गारपिटीचा प्रचंड तडाखा बसला.

यवतमाळ शहरात पहाटे चार वाजतापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह सकाळी ७ वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. त्यानंतर १० वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास आकाशात विजांचे तांडव, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने शहरात पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यात बहुतांश भागात पाऊस कोसळला. अनेक तालुक्यांत गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले.

व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – वर्धा : नाममात्र शुल्कात बदलतात शेताचे मालक; जाणून घ्या सलोखा योजना

सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटून खांब आडवे झाले. गेल्या चार दिवसांत तब्बल दीडशे वृक्ष वीजतारांवर कोसळल्याने बहुतांश भागात वीज नव्हती. आजही अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला. तो सायंकाळपर्यंत खंडित होता. आज पावसामुळे अनेक ठिकाणी नाले दुथडी भरून वाहत होते.