नागपूर : अखंड सौभाग्य प्रदान करणारे आणि मोठ्या श्रद्धेने केले जाणारे व्रत म्हणजे हरितालिका व्रत.भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. या दिवशी सुवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महादेव शंकर आणि पार्वतीचे मनोभावे पूजन करतात. यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी हरितालिका व्रत आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते. हरितालिका व्रत पूजन कसे करावे? हरितालिका व्रताची कहाणी काय आहे? जाणून घेऊया…
विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुषीसाठी तर कुमारिका चांगला वर मिळावा यासाठी हरतालिकेची पूजा करतात. तसेच हे व्रत भगवान शंकराची आराधना करण्यासाठी ही केले जाते. कारण देवी पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते.अलिकडे महिला कुटुंबात सुख, शांती नांदावी, मुलांमध्ये चांगले विचार, आचारण करण्याची वृत्ती निर्माण व्हावी यासाठी हे व्रत करतात आणि भगवान शंकराला साकडे घालतात. असे म्हणतात की ज्यांना वर्षभर सोमवारी आणि महाशिवरात्रीला शंकराची पूजा करणे शक्य होत नाही, त्यांनी हे व्रत केल्यास त्यांना बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते.
आरोग्याच्या कारणास्तव, वृद्धत्वामुळे किंवा इतर कोणत्याही सक्तीमुळे एखादी महिला दरवर्षी हा व्रत पाळू शकत नसेल, तर धार्मिक श्रद्धेनुसार तिला भगवान शिव-पार्वतीचे मनन करून उपवासाचा संकल्प सोडण्याची परवानगी आहे. अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की अशा परिस्थितीत, दुसरी कोणीतरी महिला (सून किंवा कुटुंबातील मुलगी) पुढे तो व्रत ठेवते.
हरितालिकेची कहाणी
हिमालय पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. मात्र, पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावरच ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने घरातून पळून गेली व तिने शिवप्राप्तीसाठी अरण्यात जाऊन घनघोर तपस्या केली. सलग १२ वर्षे केवळ रूईची पाने चाटून पार्वतीने तपाचरण केले. भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हस्त नक्षत्रावर पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली. दिवसभर कडकडीत उपवास केला. जागरण केले. तिच्या तपाने महादेव प्रसन्न झाले. पार्वतीच्या विनंतीला मान देऊन महादेवांनी पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी आख्यायिका आहे.
कशी कराल हरतालिकेची पूजा
या दिवशी मुली आणि सुवासिनींनी अंगाला सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ जागेवर एका जागी चौरंग ठेवावा. रांगोळी काढून आणि केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षदा, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा. सर्वप्रथम गपपती पुजन आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.
पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.