चंद्रपूर : भारतीय हवामान खात्‍याने चंद्रपूर जिल्‍ह्यात २ व ३ जून रोजी उष्‍णतेच्‍या लाटेची शक्‍यता वर्तविलेली आहे. या अनुषंगाने नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्यात कडक उन्हाळा टाकल्यानंतर जून महिन्यात ४२.८ अंश डिग्री तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. नवतपाच्या २ व ३ जून या तारखांना तर सूर्य चांगलाच तळपणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता (काय करावे ?) घ्यावी असे आवाहन केले आहे. पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा, सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्‍यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा. अशक्‍तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्‍हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

हेही वाचा – इस्लाम भारतात सुरक्षित, बाहेरचे आक्रमक गेले, आता देशात आहेत ते आपलेच – मोहन भागवत

गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात ५७ टक्‍के पीक कर्जवाटप, दिरंगाई करणाऱ्या बँकांना’ नोटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका. शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. उन्हापासून बचावासाठी वरिल सूचनांचे पालन करावे.