नागपूर : वर्षभर राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. पूर येईस्तोवर पाऊस कोसळला. अवकाळी पावसाचे सारे रेकॉर्ड मोडीत निघाले. त्यामुळे पावसाळ्यात पाऊस कोसळणार का, अशीच शंका होती. मात्र, यावेळी मान्सून वेळेआधी दाखल झाला. त्यानंतर त्याने ‘ब्रेक’ घेतला. आणि जुलैच्या मध्यान्हानंतर मान्सूनने चांगला जोर पकडला. सध्या त्याने काहीशी विश्रांती घेतली आहे, पण पुन्हा तो त्याच्या मूळरुपात कोसळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. काही ठिकाणी त्याचा वेग कमी झाला आहे, तर ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी काही ठिकाणी कोसळत आहेत. अशातच आता भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषकरुन विदर्भात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, अशी शक्यता देखील हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – नागपूर : ‘आई, मी मोबाईलमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष केले’, असे लिहून मुलीने संपविले जीवन

मान्सून दाखल झाला तेव्हा विदर्भाच्या पश्चिम भागात तो जोरदार कोसळला. मात्र, त्याचवेळी पूर्व विदर्भाकडे त्याने पाठ फिरवली. आता मात्र तो सगळीकडे सारखाच बरसत आहे. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस पावसाने काहीशी विश्रांती घेतली, पण पुन्हा एकदा तो परतणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मॉन्सून ट्रफ सध्या आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे. तर वायव्य मध्यप्रदेश आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत.

विदर्भातील अमरावती, नागपूर आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला. तर राज्याची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यात मात्र आज कडक उन्हाचे चटके जाणवले. त्यामुळे सततच्या पावसाने कंटाळलेल्या नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळाला. तर आता खात्याने पावसाचे संकेत दिल्यामुळे काहीशी निराशाही नागरिकांमध्ये आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा – ‘अंगणवाडी सेविकांमार्फत महिलांना रवी राणांच्या धमक्‍या’, भाजपच्या नेत्‍याचा आरोप

मंगळवारपासून विदर्भात पाऊस त्याच्या मूळ रुपात परतेल, असा अंदाज आहे. यावेळी चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बुधवारी देखील विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भातील बुलडाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज आहे. यादिवशी देखील या जिल्ह्यांना पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.