नागपूर : राज्यातून पावसाच्या परतीचा प्रवास सुरु व्हायचा असला तरी अनंत चतुर्दशीनंतर मात्र पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरुपाचा असणाऱ्या पावसाचे आता अनेक ठिकाणी मुसळधार पावसात रुपांतर झाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण याठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या उपराजधानीत आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली.

पुढील चार दिवस पाऊस का ?

मान्सूनने पश्चिम राजस्थान व गुजरातमधील कच्छ येथून परतीचा प्रवास काल सुरु केला. त्यामुळे आता बंगालच्या उपसागरात आणि म्यानमारच्या दक्षिण किनारपट्टीवर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून आजपासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, ते महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान विषयक स्थितीचा परिणाम म्हणून पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस असल्याने पुढील चार दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हेही वाचा – Prakash Ambedkar : “अक्षय शिंदेला पोलीस कशाच्या शोधासाठी घेऊन जात होते?”, प्रकाश आंबेडकरांचा सवाल

उकाड्याची स्थिती

यावर्षी राज्यात जवळजवळ सर्वत्रच पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला असला तरीही अजूनही वातावरण मात्र थंड झालेले नाही. गणेशोत्सव काळात पावसाने उघडीप दिली आणि राज्यात सर्वत्र उकाडा वाढल्याचे दिसून आले. राज्यातील काही शहरांमध्ये उन्ह देखील होते. त्याचा परिणाम म्हणून वातावरणात प्रचंड उकाडा होता. पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकांनी कुलर काढून ठेवले असले तरी या उकाड्याने त्याची आठवण करुन दिली. दिवसाच नाही तर रात्री देखील वातावरणात गारव्हा नव्हता. त्यामुळे आता चार दिवसाच्या पावसानंतर तर वातावरणात थंडावा निर्माण होईल अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा – Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कसा झाला? आता सीआयडी करणार तपास!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाचे अलर्ट कुठे ?

आजपासून पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असून याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवरील काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.