चंद्रपूर : शहर व परिसरात पहाटे पाच वाजता पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर सर्वदूर गुडघा भर पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जून व जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्याचे सात ते आठ दिवस उन्हाळ्या सारखे ऊन तापत होते. त्यामुळे गर्मी वाढली होती. मंगळवारी दुपारी आकाशात ढग एकत्र आले आणि पावसाला सुरुवात झाली. बुधवारी पहाटे पाच वाजता पासून तर पावसाने जोर पकडला आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर सर्वदूर पाणीच पाणी साचले आहे.

गांधी चौक, आझाद बगीचा, कस्तुरबा मार्ग, मूल रोड, वाहतूक पोलिस कार्यालय, शास्त्री नगर तसेच शहरातील खोलगट वस्त्यांमध्ये सर्वात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पाऊस बघता शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपुरातील मुख्य बाजार असलेल्या गोल बाजार, गंज वार्डातील भाजी बाजार, दाताला मार्ग या भागातही पावसाचे पाणी साचले आहे.

महापालिकेने यावर्षी शहरातील नाले सफाई केले असले तरी पावसामुळे सर्व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शहरातील खोलगट वस्त्यांमध्ये अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. कस्तुरबा मार्गावर पाणी साचले असल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कार्यालयात देखील पावसाचे पाणी शिरले आहे. शहरातील आझाद बागेत देखील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. मुल मार्गावर पाणी साचले असल्याने वाहतूक खोळंबली आहे. तर रहमत नगर भागात तसेच इरइ नदी काठावर अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे.