नागपूर : थोडसा जरी पाऊस झाला तरी नागपुरातील भुयारी पुलाखाली पाणी साचते व वाहने खोळंबतात. सोमवारी दुपारी तर नागपुरात मुसळधार पाऊस पडला. सुमारे तासभर पडलेल्या पाण्यामुळे रस्त्यावर तर पाणी साचलेच. शिवाय बर्डी, धंतोली, नरेंद्रनगर, मनीषनगर भागातील भुयारी मार्ग पाण्याने तुडुंब भरले. त्यामुळे येथील वाहतूक खोळंबली. ऐन वर्दळीच्या वेळी तेथे लांबच लांब वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या.

सोमवारी सकाळपासूनच नागपुरात आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे पावसाचा अंदाज होताच. दुपारी दोनचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. संपूर्ण शहरात पाऊस झाला. सलग तासभर पडलेल्या पावसामुळे नागपुरात दाणादाण उडाली. रस्त्यावर पाणी साचले. खोलगट भागातील चौक पाण्याने भरले. दुपारची वेळ असल्याने आणि पाऊस अधिक असल्याने जेथे जागा मिळेल तेथे नागरिक आडोसा घेऊन उभे होते.

पाऊस कमी झाल्यावर एकाच वेळी सर्वजण पुन्हा मार्गस्थ होण्यासाठी निघाले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची एकच गर्दी वाढली. धंतोली येथील रेल्वे अंडरब्रीज खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यातून वाहने काढणे धोक्याचे असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाहने खोळंबली. त्यामुळे तेथे वाहनांची एकच गर्दी झाली. त्याचा परिणाम इतर मार्गावर झाला. नरेंद्रनगर रेल्व अंडर ब्रीजची हीच अवस्था होती. बर्डीवर मेट्रोने बांधलेल्या पुलाखाली. लोखंडी पुलाखाली, मनीषनगरमधील मेट्रोच्याच भुयारी मार्गात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे तेथून वाहने काढणे अशक्य झाले होते.

भुयारी मार्गावर साचलेले पाणी काढण्यासाठी उपाययोजनाच नाही, त्यामुळे प्रत्येक वेळी पाऊस झाला की वाहन कोंडी हे चित्र नागपुरातील आहे. सोमवारी पुन्हा त्याचा प्रत्यय आला आहे. बर्डीचे मेट्रो स्थानकलाही गळती लागल्याचे दिसून आले.