अकोला : वाशिम जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. पूर आल्याने अनेक मार्ग बंद होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. जलसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने विसर्ग सुरू करण्यात आला. अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी साचले असून खरीप हंगामातील पिके पाण्यात गेल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्याला पुढील पाच दिवस मुंबई वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १७.५ मि. मी. पाऊस झाला असून कारंजा तालुक्यात सर्वाधिक ३९.१ मि.मी. पाऊस पडला. मानोरा तालुक्यात ३८.९ मि.मी., मंगरूळपीर १८.५, मालेगाव ३.२, रिसोड ३.३ व वाशिम तालुक्यात ८.६ मि. मी. पाऊस झाला. अडाण प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने दोन द्वार उघडण्यात आले. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बेंबळा नदीच्या पातळीत झाल्यामुळे शिरसोली ते अंभोळा, हिंगणवाडी ते रामटेक मार्गात पुलावरून पाणी जात असल्याने रस्ता बंद झाला. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली. जिल्ह्यातील शेदोना गावाजवळचा पूल अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झाला असून वाहतूक बंद झाली आहे. सोंडा ते अनसिंग मार्ग पुरामुळे बंद झाला. विद्यार्थी व नागरिक अडकून पडले होते.
मानोरा तालुक्यातील पारवा येथे ढगफुटी सदृश पाऊस झाला. अरुणावती नदीला पूर आला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसासोबतच वादळी वारा देखील सुटला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वीज यंत्रणेवर वृक्ष पडल्यामुळे विविध भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. कारंजा शहरात विजेच्या खांबावर वृक्ष कोसळले होते.
जिल्ह्याला अतिवृष्टीचा वारंवार फटका
वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. खरीप हंगामातील पिकांना त्याचा मोठा फटका बसला. शेतांमध्ये पावसाचे प्रचंड पाणी साचले. त्याचा परिणाम पिकांवर झाला. पिकांवर विविध रोगराई येत आहे. सोयाबीन, तूर, कापूस, हळद, भाजीपाला, फळबाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा खचून गेला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेत सुद्धा पावसाचा अडथळा येत आहे.