वर्धा : गुरुवारी रात्री पासून कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्यास बेदम झोडपून काढले आहे. पाणीच पाणी चहुंकडे, गेला रस्ता कुणीकडे अशी ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. शहरात पण शासकीय कार्यालये ओस पडली असून जनजीवन ठप्प पडले आहे. आज पण बारा वाजतापासून पावसाने रिपरिप लावली आहे. अद्याप धरण भागात धोकादायक स्थिती नसल्याचे सांगण्यात आले आहे.

धुवाधार पावसाने कच्ची घरे कोसळून पडली आहेत. देवळी तालुक्यातील नाचणगाव येथे किरण बुजाडे या ३२ वर्षीय युवकाचा घराची भिंत अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार देतात. तर दहेगाव स्टेशन गावातील नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. परिणामी गावातील बोगद्यात तलाव झाला. त्याचवेळी काही गावकरी वायफड येथून दवाखान्यात उपचार आटोपून परत येत होते. तेव्हा रात्री १२ वाजताच्या सुमारास घाई करीत ऑटो चालकाने बोगद्यातून ऑटो टाकला.

पाण्याचा अंदाज न आल्याने ऑटो पाण्यात वाहू लागला. पाच गावकऱ्यापैकी तीन उतरू शकले. ते गावात परतले. त्यांनीच दोघे वाहत गेल्याचे पोलीस पाटील संजय खोब्रागडे यांना कळविले. लगेच धाव घेत गौरव गावंडे व अन्य लोकांनी ऑटो चालक व प्रभाकर पंचभाई हे वाहत जात असतांना त्यांना पुरातून बाहेर काढले. आता सर्व सुखरूप आहेत.

यशोदा नदीला पूर आल्याने आलमडोह ग्रामपंचायत इमारत पाण्यात गेली आहे. तसेच आलमडोह ते अल्लीपूर वाहतूक बंद पडली आहे.तसेच वर्धा राळेगाव मार्ग ठप्प पडला आहे. आमदार राजेश बकाने हे म्हणतात की पुरामुळे स्थिती फार खराब झाली आहे. भिंत पडून मृत्यू झालेल्या कुटुंबासोबतच मी आता आहे. टिन पडल्याने हा अपघात झाला. मृत व्यक्तीचे आईवडील यांना अन्यत्र आश्रय दिला. तसेच शिधा भांडी पुरविली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर शासनाची चार लाख रुपयाची सानुग्रह मदत लवकरच मिळेल. या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. रस्ते पण उखडले.

शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचे दुर्दैवी चित्र आहे. आपण पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांना भेटून विशेष मदतीची मागणी करणार आहोत. सर्व मार्गी लागेपर्यंत मी गावातच थांबणार. दोन दिवसातील पावसाने जिल्ह्यात सार्वत्रिक हजेरी लावली असून काही तालुक्यात माहिती घेणे सूरू असल्याचे सांगण्यात आले.