गडचिरोली : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून पूर आल्याने १६ मार्ग बंद झाले आहे. उत्तर गडचिरोलीतील देसाईगंज उपविभागाला पावसाचा सर्वाधिक तडाका बसला आहे. बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत असल्याने इशारा पातळीजवळ पोहोचल्या असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्याला दरवर्षी पावसामुळे मोठे नुकसान झेलावे लागते. यंदाही जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देसाईगंज, कुरखेडा उपविभागातील १६ मार्गावरील रहदारी बंद झाली आहे. सोमवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहे. सोबतच गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जिल्ह्यातील मुख्य वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आणखी काही मार्ग बंद होऊ शकतात. तर काही नद्या इशारा पातळीच्याजवळ पोहोचल्या आहे. खबरदारी म्हणून जिल्हा व राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या चमूला तयारीची सूचना देण्यात आली आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा कुरखेडा तालुक्याला बसलेला आहे. येंगलखेडा लघु सिंचन प्रकल्प देखील भरल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेत पूरस्थितीचा आढावा घेतला असून आपत्ती निवारणासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहे.

घाबरू नका, सतर्क राहा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसासोबतच गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना घाबरू नका, पण सतर्क राहा असे आवाहन करत नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेची उपाययोजना राबविण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला दिले आहेत. पूलावरून पाणी वाहत असल्यास तिथे मोटारसायकलने जाणे अत्यंत धोकादायक आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी जाऊ नये, तसेच नदी प्रवाह पाहण्यासाठी पर्यटन व सेल्फी घेण्याचे प्रकार पूर्णतः टाळण्याचेही आवाहनही त्यांनी केले आहे. पोलीस विभागाने धोकादायक भागांमध्ये बॅरिकेटिंग करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुरामुळे बंद असलेले मार्ग

कुरखेडा मालेवाडा रस्ता राज्यमार्ग ३६२ (खोब्रागडी नदी), कोरची बोटेकसा भीमपूर रस्ता राज्यमार्ग ३१४ (भीमपूर नाला), कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग ३७७, मांगदा ते कलकुली, कढोली ते उराडी, चातगाव रांगी पिसेवाडा, गोठनगडी चांदागड सोनसरी, कुरखेडा तळेगाव चारभट्टी, आंधळी नैनपुर (सती नदी) शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप, आष्टी -उसेगाव-कोकडी -तुलसी-कोरेगाव, मालेवाडा-खोब्रामेंढा, वैरागड-देलनवाडी, चौडमपल्ली-चपराळा, सावरगाव-गारपट्टी-कोटगुल, अरसोडा कोंढाळा-कुरूड – वडसा हे १६ मार्ग बंद आहेत.