बुलढाणा : निसर्गाचे तांडव काय असते, याचा प्रत्ययकारी अनुभव आज, गुरुवारी एक लाख बुलढाणा शहर व परिसरवासीयांना आला. संध्याकाळी वादळी वारे विजांचा कडकडाट, यांसह झालेल्या मुसळधार पावसाने बुलढाणा शहरात अक्षरशः थैमान घातले. मृग नक्षत्रातील हा पहिलाच पाऊस वादळी आणि लाखो बुलढाणेकरांच्या अनेक दिवस स्मरणात राहील, असा ठरला.

पावसाच्या थैमानामुळे घराबाहेर असलेल्या वाहनचालक, पादचारी, रस्त्यांवरील किरकोळ विक्रेते यांची अक्षरशः तारांबळ उडाली. आज, गुरुवारीसंध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक पावसाला सुरुवात झाली. संथगतीने सुरू झालेल्या या पावसाने पाहता पाहता वेग धरला. काही मिनिटांतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

या पाठोपाठ वादळी वारे वाहू लागले. सोसाट्याच्या वाऱ्याने पाऊस पांगला. मात्र, वारे क्षीण होताच पावसाचा जोर पुन्हा वाढला. वाऱ्याने विश्रांती घेताच विजांनी आभाळात तांडव सुरू केले. विजांचा कडकडाट जीवाचा थरकाप उडवणारा ठरला. दहा मिनिटे सौदामिनीचा हा रौद्र खेळ सुरू होता.

अमवास्येच्या रात्रीसारखा दिवसा अंधार

यादरम्यान संपूर्ण बुलढाणा शहर अंधारून आले. अमवास्येच्या रात्रीसारखा अंधार दिवसा दाटून आल्याने रस्त्यांवरील वाहनचालकांना अक्षरशः दिवे लावून प्रवास, मार्गक्रमण करण्याची वेळ आली.

निसर्गाच्या तांडवामुळे अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांच्या चालकांनी रस्त्याच्या बाजूला वाहने लावण्यास पसंती दिली. सुमारे एक तास निसर्गाचे तांडव सुरू होते. यानंतरही पावसाची रिपरिप आणि विजांचा कडकडाट संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरूच राहिला. यामुळे मृग नक्षत्रातील पहिल्याच पावसाने लाखावार बुलढाणावासीयांच्या जीवाचा थरकाप उडवून त्यांना सूचक इशाराच दिला.