दोन वर्षांपूर्वीच्या शंकांना पूर्णविराम; जंगलतोड, शिकार रोखण्यात यश

वनखात्याच्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या हेल्पलाईनविषयी सुरुवातीचा काळात शंका व्यक्त करण्यात आली असताना, गेल्या दोन वर्षांत त्याला मिळालेल्या प्रतिसादानंतर या सर्व शंका मोडीत निघाल्या आहेत. आतापर्यंत २०३४ आपातकालीन कॉलची नोंदणी या हेल्पलाईनवर करण्यात आली असून त्यातील १९४० प्रकरणे २४ तासांच्या आत निकाली काढण्यात आले.

भारतातील कोणत्याही राज्याच्या वनखात्यात अशाप्रकारची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर यासंदर्भात काही करता येईल का, यादृष्टीने चाचपणी केली. २०-२१ नोव्हेंबरला पार पडलेल्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या परिषदेत जनतेशी थेट संपर्क करण्याच्या दृष्टीने टोल फ्री क्रमांकाची मागणी करण्यात आली. त्यानंतर ‘हॅलो फॉरेस्ट १९२६’ या हेल्पलाईनची निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. पाच जानेवारी २०१७ ला या हेल्पलाईनचे उद्घाटन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या हेल्पलाईनचा उद्देश वृक्षारोपण, वनसंवर्धन यासह वन्यप्राण्यांची अवैध शिकार, अतिक्रमण, वणवा आदी मुद्यांवर नागरिकांशी थेट संपर्क साधणे हा आहे. तसेच वनखात्याविषयीची इतर माहिती या माध्यमातून नागरिकांना घेता येणे शक्य आहे. त्यावेळी अनेकांनी या हेल्पलाईनविषयी शंका व्यक्त केली. मात्र, हळूहळू या शंकेची जागा विश्वासाने घेतली. आपातकालीन कॉलिंगकरिता याला २४ बाय सात अशी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लोकांना जोडण्यासाठी वनखात्याचे हे महत्त्वाचे पाऊल आहे. जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात अवैध शिकारीची माहिती देण्याकरिता तब्बल १८९, अवैध जंगलतोडीकरिता १७४ कॉल वनखात्याला आले. तर मार्चमध्ये ही संख्या अनुक्रमे ४८ आणि ५४ वर आली.

सामान्य माणसाला यापूर्वी वनविभागाकडे मदत मागण्यासाठी व्यासपीठ नव्हते. आता एका कॉलवरुन मदत मागता येते आणि वनखात्याला मदतही करता येते. यापूर्वी शिकार, अवैध वृक्षतोड आदीची माहिती देताना नागरिकांना भीती असायची. या हेल्पलाईनमध्ये नाव आणि नंबर गुप्त ठेवले जातात. त्यामुळे अनेकजण आता माहिती देण्यासाठी समोर येत आहेत. या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर संबंधीत अधिकाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. तो अधिकारी माहिती देणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळ आदी विचारुन लगेच कारवाईसाठी सज्ज होतो. यात वनाधिकारी कुठेही टाळाटाळ करु शकत नाहीत, कारण हा कॉल वरिष्ठस्तरापर्यंत नोंद केला जातो. येणाऱ्या कॉलचा मागोवा घेतला जातो. विशेष म्हणजे पहिल्यांदाच रात्रीसुद्धा या हेल्पलाईनवर माहिती देता येते आणि त्यांची नोंद घेऊन कारवाईसुद्धा केली जाते. वनखात्याच्या योजनांची माहितीसुद्धा त्यावरुन दिली जाते. येथे कॉल करताच तात्काळ संपर्क होऊन संबंधीत माहिती अथवा समस्या लागलीच संबंधीत वनाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केली जाते. थेट उपनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे समस्या अथवा माहिती दिली जात असल्याने कारवाई होते.

प्रतिसाद

गेल्या एक वर्षांत ‘हॅलो फॉरेस्ट १९२६’ या हेल्पलाईनवर एकूण २८ हजार ३९८ कॉल आले. यात आपातकालीन कॉलची संख्या २०३४, निसर्ग पर्यटनाची संख्या ४९७, सामान्य माहितीकरिता ५६२०, हरित सेनेकरिता ५१३५, व्यापारकरिता २४९ आणि इतर १४ हजार ८६३ कॉल नोंदवण्यात आले. आपातकालीन कॉलमध्ये ठाणे जिल्ह्यातून ३८१, औरंगाबादमध्ये ३४१, कोल्हापूरमध्ये २७५, अमरावती १७३, गडचिरोली १९ आणि चंद्रपूरमधून ६८ कॉल नोंदवण्यात आले.

वणव्याची माहिती

एप्रिल २०१८ मध्ये यवतमाळ व पांढरकवडा दरम्यान कळंब वनपरिक्षेत्रात आग लागली होती. रात्री १२.३० वाजता एका नागरिकाला ते दिसले. त्याने तात्काळ हेल्पलाईनशी संपर्क साधला असता माहिती देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून वनाधिकाऱ्यांनी आगीचे ठिकाण जाणून घेतले आणि अवघ्या काही तासात आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यतील पन्हाळा वनपरिक्षेत्रात एका नागरिकाने बिबटय़ाच्या शिकारीची माहिती या हेल्पलाईनला दिली. याही प्रकरणात वनाधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

वनांचे महत्त्व वाढीस

हेल्पलाईनच्या माध्यमातून वनविभाग लोकाभिमुख होत आहे. तसेच नागरिक आणि स्थानिक वन्यजीवप्रेमी व वनविभागाचे अधिकारी या सर्वानाच हे सोयीचे ठरत आहे. विविध समाजघटकांना एका क्षणात माहिती मिळत असल्यामुळे प्रसंगी समस्येचे थेट निराकरण होत आहे. यामुळे वने आणि वन्यजीवांचे महत्त्व वाढले आहे. एका तक्रारीवर नोंदणी होत असल्याने माहिती गोळा होते. समस्या प्राधान्यक्रमाने निश्चित होतात. विशेष म्हणजे मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होते.