मदत व पुनर्वसन मंत्र्यांची घोषणा

नागपूर : कोकण किंवा इतर भागात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना ज्या निकषानुसार मदत करण्यात आली, त्याच धर्तीवर विदर्भातील बाधित कुटुंब व शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील अहवाल शासनाला सादर करावेत, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी येथे दिले.

नुकसानीसंदर्भातील पंचनामे पूर्ण करताना शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन एकही शेतकरी सुटणार नाही, याची खबरदारी घ्यावी, पिकांसोबतच बाधित रस्ते रस्त्यांच्या नुकसानीसंदर्भातील प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निकषानुसार तयार करावे, नुकसानीसंदर्भातील निधी संबंधित जिल्ह्यला तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असे वड्डेट्टीवार म्हणाले.

विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी नागपूर विभागातील पूरपरिस्थिती व नुकसानीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार उपस्थित होते. पुरामुळे कायमस्वरूपी बाधित होणाऱ्या गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्यासाठी गावनिहाय प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी  नागपूर विभागात पुरामुळे झालेल्या रस्त्यांच्या हानीकडे वड्डेट्टीवार यांचे लक्ष वेधले होते. रस्ता दुरुस्तीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून निधी उपलब्ध करून ध्यावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. ती मान्य करीत यासंदर्भात तातडीने प्रस्ताव पाठवा, निधी दिला जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सुसज्जतेची माहिती दिली. अतिवृष्टी व पुरामुळे झालेले शेतपिकांचे, घरांचे तसेच  मनुष्य व पशुहानीसंदर्भात झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात येत असल्याचे सांगितले. कोविडच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

बैठकीला नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर., वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भंडाऱ्याचे संदीप कदम, दूरदृश्य प्रणालीद्वारे गोंदियाच्या नयना गुंडे, गडचिरोलीचे दीपक सिंघला, चंद्रपूरचे अजय गुल्हाने, नागपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे उपस्थित होते.

विभागातील पाऊस

जिल्हा टक्के

चंद्रपूर  ७२.३६

नागपूर ५५.५१

वर्धा  ५८.३३

भंडारा ५२.१३

गडचिरोली ५०.२८

गोंदिया  ४७.०२

एकूण ५५.९४