विरोधकांच्या हातात मात्र आयतेच कोलीत
महापालिका निवडणूक समोर असताना शरद पोंक्षे यांनी काही राजकीय पक्षांच्या छुप्या मदतीने राज्यात जागोजागी ‘हे राम नथुराम’ या नाटकाचा प्रयोग सुरू करून विरोधकांच्या हातात मात्र आयतेच कोलीत दिले आहे. या नाटकाच्या प्रयोगाला अत्यल्प प्रतिसाद असला तरी नियोजित दोन्ही प्रयोग करू, असा पोंक्षे यांच्या अट्टाहास आणि प्रयोग उधळून लावू, असा संभाजी ब्रिगेड यांचा पवित्रा. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर वातावरण गढूळ होत असून या प्रयोग सादरीकरणामागील राजकीय शक्तीला अपेक्षित वातावरण निर्मिती होत आहे.
नागपुरात २१ फेब्रुवारीला महापालिकेसाठी मतदान होत आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपसाठी ही प्रतिष्ठिची लढाई आहे, तर काँग्रेसला पुनरागमन करून मरगळ झटण्याची संधी आहे. सामजमाध्यम, साहित्य, नाटकाचे प्रयोग, शाखा, प्रसार माध्यमातून सातत्याने आपल्या बाजूने मत बनवण्याचे प्रयत्न भाजपचा आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष या आघाडीवर अजूनही पिछाडीवर आहेत. माहितीचा सतत मारा करून लोकांना विचार करण्याची संधी द्यायची नाही, असे मोठे माहितीयुद्ध सुरू झाले असून विविध माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचे कसब भाजप आणि त्यांच्या विविध संस्था व संघटनांनी अवगत केले आहे. त्यामुळे एखादी गोष्ट नैसर्गिकरीत्या घडत असल्याचे जरी भासत असले तरी ती घडवली जात आहे. हे विरोधकांनाही समजत नाही. राज्यातील १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषद निवडणुका पुढील महिन्यात होत आहे. या पाश्र्वभूमीवर अशा वादग्रस्त नाटकाचे प्रयोग करवून मतांचे ध्रुवीकरण करण्याची योजना दिसत आहे.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी झालेल्या प्रयोगासाठी लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त. संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून झालेला विरोध आणि बोटावर मोजण्या इतका नाटकाला मिळालेला प्रतिसाद बघता पोलिसांनी ज्या पद्धतीने प्रयोग झालाच पाहिजे, अशी जी भूमिका घेतली त्यावरून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आणि विरोधकांना आंदोलन करण्याची संधी देण्याचा प्रकार असावा, असे म्हणण्यास जागा आहे. ‘हे राम नथुराम’ या नाटकाच्या प्रयोगावरून राज्यात ठिकठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्वी पुण्यातील संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळा काढून टाकण्यात आला. त्याचे संभाजी ब्रिगेडने जोरदार समर्थन केले. संभाजी ब्रिगेड राज्यातील सर्व महापालिका निवडणुका लढवत आहे. शिवाय, त्यांनी पहिल्यापासून इतिहासाचे विकृतीकरण थांबण्याचे आणि इतिहास नव्याने लिहिण्याची भूमिका घेतली आहे.
संभाजी आणि शिवाजी महाराजांवरील वाद संपत नाही, तर पोंक्षे यांनी ‘हे राम नथुराम’चे प्रयोग ठिकठिकाणी करून काहींना अपेक्षित मोहोळ तयार करण्याचे धाडस दाखवल्याचे यातून दिसून येते. नाटकाच्या प्रयोगाला विरोध करणाऱ्यांना ठणकावतांना पोंक्षे यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. महापालिका निवडणुका असल्याने नाटकाच्या प्रयोगाला विरोध होत आहे. नथुरामचे उदात्तीकरण केले जात नाही, पण त्यांनी देशकार्य केले, हेही विसरता येत नाही, असे पोंक्षे म्हणाले.
पोक्षेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा -संभाजी ब्रिगेड
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्याला हिरो ठरवण्यासाठी नाटकाचा प्रयोग करणाऱ्या शरद पोंक्षेवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अमोल मिटकरी यांनी केली.