|| मंगेश राऊत

अतिरिक्त कामावरून वादाची ठिणगी:- उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सायंकाळी उशिरापर्यंत काम करण्याच्या पद्धतीवरून वादळ उठले आहे. न्यायमूर्ती आणि काही वकिलांमध्ये याबाबत मतभेद निर्माण झाले असून तक्रार व अर्जाचा सिलसिला सुरू झाला झाल्याने न्यायमूर्तीनी अतिरिक्त कामाचे तास कमी केले आहेत.

लोकांच्या अधिकारांचे रक्षण करणाऱ्या उच्च न्यायालयाची कामाची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० पर्यंत आहे. पण, प्रलंबित प्रकरणांची संख्या बघता नागपूर खंडपीठातील अनेक न्यायमूर्ती सायंकाळी ४.३० नंतरही जवळपास ७ वाजेपर्यंत काम करतात. त्यामुळे उच्च न्यायालयातील कर्मचारी व वकिलांना न्यायालयाचे काम संपेपर्यंत थांबावे लागते. दरम्यान, एका वकिलाने राज्याचे मुख्य न्यायमूर्ती व प्रशासकीय न्यायमूर्तीकडे तक्रार केली व सायंकाळी ४.३० वाजेनंतर काम करण्यात येऊ नये, अशी विनंती केली. सायंकाळी उशिरापर्यंत काम केल्यास आम्हाला कार्यालयात जाऊन पक्षकारांना भेटणे व इतर कामे होत नसल्याचे सांगितले. या तक्रारीला प्रशासकीय न्यायमूर्तीनी गांभीर्याने घेऊन आपल्या सहकारी न्यायमूर्तीशी चर्चा केली. त्यानंतर आता सायंकाळी ४.३० नंतर काम बंद झाले आहे.

याचा त्रास काही वकिलांना होऊ लागला आहे. न्यायालयात  हजारो प्रलंबित खटले असून त्यांचा लवकरात लवकर निपटारा झाल्यास नागरिकांना लवकर न्याय मिळेल. उच्च न्यायालयाला दिवाळी, नाताळ आणि उन्हाळा या कालावधीमध्ये जवळपास दोन महिन्यांच्या सुटय़ा असतात. या काळामध्ये केवळ आपत्कालीन न्यायालय सुरू असते. न्यायालयात मिळणाऱ्या सुटय़ांवरही अनेकांचा आक्षेप असून न्यायालयांनी अधिकाधिक काम करण्याची मागणी करण्यात येत आहे. कामकाजाची वेळ संपल्यानंतरही काही न्यायमूर्ती स्वेच्छेने अतिरिक्त काम करीत असतील  तर ते समाजासाठी फायद्याचे आहे. त्यामुळे न्यायमूर्तीनी अतिरिक्त वेळेत काम करावे, अशी मागणी करणारा दुसरा अर्ज अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी दाखल केला. या अर्जावर न्या. रवि देशपांडे यांनी भांडारकर यांच्याशी खासगी कक्षात चर्चा करून संबंधित अर्ज राज्याच्या मुख्य न्यायमूर्तीनाही पाठवण्याचे आदेश दिले. अतिरिक्त कामाच्या पद्धतीवरून उच्च न्यायालयात उठलेले हे वादळ आता केव्हा शमणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.