राज्यातील सहा जिल्ह्य़ांत ‘मातृ वंदन’चे सर्वाधिक लाभार्थी

राज्यातील सहा जिल्ह्य़ांत   प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचे   सर्वाधिक लाभार्थी आहेत. 

पुणे प्रथम, मुंबई द्वितीय, नागपूर पाचव्या स्थानी

महेश बोकडे
नागपूर :  राज्यातील सहा जिल्ह्य़ांत   प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचे   सर्वाधिक लाभार्थी आहेत. २०१७ ते ७ सप्टेंबर २०२१ पर्यंत राज्यातील २४ लाखांवर   गर्भवतींना   १,००८ कोटी   ७२ लाख १८ हजार रुपयांची मदत मिळाली आहे. सर्वाधिक एक लाखाहून अधिक लाभार्थी असलेल्या जिल्ह्य़ांमध्ये पुणे प्रथम, मुंबई द्वितीय, नाशिक  तृतीय, अहमदनगर  चौथ्या, नागपूर पाचव्या तर ठाणे  सहाव्या क्रमांकावर आहे.

आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, राज्यात ही योजना सुरू झाल्यापासून ७ सप्टेंबर २०२१   पर्यंत पुणे येथील १ लाख ९६ हजार २०० गर्भवतींनी ८९ कोटी ९७ लाख ३५ हजार रुपयांची मदत मिळाली.

मुंबईत   १  लाख ५९ हजार ८५८ गर्भवतींनी ६९ कोटी ४४ लाख   ६८   हजार,   नाशिकमध्ये १   लाख   ३९   हजार   ६२२ गर्भवतींनी    ६४    कोटी ३ लाख ९३ हजार, अहमदनगरमध्ये १ लाख ३ हजार ९६९ गर्भवतींनी ४७ कोटी ३९ हजार ८८ हजार, नागपूरमध्ये १ लाख २ हजार ५७१ गर्भवतींनी ४६ कोटी ४३ लाख ३४ हजार तर ठाण्यात १ लाख २ हजार १७७ गर्भवतींनी ४४ कोटी १८ लाख ७९ हजार रुपयांची मदत मिळाली.

गरोदरपणात माता कुपोषित राहू नये यासाठी राज्यात ही योजना राबवली जाते.

अनेकदा ग्रामीण व आदिवासी भागात  गर्भवती महिलांना बाळंतपणाच्या वेळेपर्यंत काम करावे लागते. अनेक महिलांना गर्भारपणात तसेच प्रसूतीनंतर लगेच मजुरी करणे शक्य होत नाही. अशावेळी रोजगार बुडून माता व बाळ कुपोषित राहण्याची शक्यता असल्याने दारिद्रय़रेषेखालील तसेच दारिद्रय़ रेषेवरील मातांसाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली.

यात केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारचा वाटा ४० टक्के आहे. या योजनेत गर्भवतीस तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येतात, अशी माहिती आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Highest number beneficiaries matru vandana six districts state ssh