वर्धा: वर्धा जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग गेल्याने झोकदार वळणाच्या या मार्गावरून वर्धेकर मुंबईस रवाना होवू लागले. या प्रशस्त मार्गावर अपघात घडत आहे, तरी वर्धेपासून दहा किलोमीटर अंतरावरील येळाकेळी  येथील टोल नाक्यापासून थेट समृद्धीवर दाखल होणे वर्धेकर टाळत नाही. आता या पाठोपाठ एक प्रशस्त मार्ग जिल्ह्यातून जाणार असून त्याचा आरंभ पुण्यभू सेवाग्राम पासून होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात तशी घोषणा केली. त्याबद्दल पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष भेटून आज मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहे.

राज्य शासनाच्या शक्तीपीठ या महामार्गाचा आरंभ सेवाग्राम पासून होणार असून नागपूर ते गोवा असे अंतर मार्ग कापणार. ८०२ किलोमीटरच्या या मार्गामुळे विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढणार. हा मार्ग कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका आई, अंबेजोगाईची योगेश्वरी माता आदी शक्तीपिठना जोडणार. तसेच परळी वैजनाथ, औंढा नागनाथ व अन्य तीर्थस्थळे जोडल्या जाणार. पर्यटनास या मार्गाने  गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. भोयर व्यक्त करतात. विकासास वेग येईल. हा मार्ग राज्यातील १२ जिल्ह्यातून जाणार आहे. समृद्धी नंतर या मार्गामुळे वर्धा जिल्ह्याच्या प्रगतीस अधिक चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शक्तीपीठ महामार्गचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब म्हणून आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे वर्धा जिल्हावासियांच्यावतीने  आभार मानले, असे डॉ. भोयर म्हणाले. सदर महामार्गची प्रत्यक्ष सुरवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरणा स्थळ असलेल्या सेवाग्रामातून होणार आहे. हा विकासाचा नवा व प्रशस्त मार्ग ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हे दोनच नव्हे तर अन्य काही मार्ग झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा राज्यभरातील प्रवास सुलभ व सोयीचा झाल्याचे म्हटल्या जाते. बुटीबोरी ते तुळजापूर मार्ग सुद्धा त्यात भर टाकणारा ठरला. शिवाय चार राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातूनच अन्य जिल्ह्यात जातात. जिल्ह्याच्या सभोवताल  आता राष्ट्रीय व राज्य महामार्गचे जाळेच विणल्या गेल्याचे दिसून येते. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केले की वेगवान प्रवासासोबतच या सर्व मार्गावरील प्रवास सुरक्षित करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिल्या जाईल.