यवतमाळ : राजकारण आणि समाजकारणात प्रसिद्ध असलेले जिल्ह्यातील महत्वाचे घराणे म्हणजे पारवेकर. मोघल साम्राज्यापासून पारवेकर कुटुंब जमीनदार म्हणून महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकात ओळखले जातात. गेल्या साडेतीनशेपेक्षा अधिक वर्षांपासून पारवेकर कुटुंबाचा गौरवशाली इतिहास जपत घाटंजी तालुक्यातील पारवा गावात उभा असलेला चिरेबंदी वाडा आजही अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.
पारवेकर घराणं हे विदर्भ-मराठवाड्यातील मोठं प्रस्थ. पांढरकवडा तालुक्यातील पारवा येथील पारवेकर घराणे एकेकाळी विदर्भ-मराठवाड्यातील सर्वात मोठे इजारदार होते. मुघल राजवटीने त्यांना या भागाची इजारदारी बहाल केली होती. पुढे निजाम सरकारने ती कायम ठेवली. इंग्रजांच्या काळातही या भागातील सरकार म्हणजे पारवेकरच होते आणि आजही पारवेकर यांच्याशिवाय कुठलाच सण, उत्सव, तोरण, मरण किंवा राजकारणही पूर्ण होत नाही.
पारवा येथे गढीवर वसलेला आणि चारही बाजूने बुरूज व दगडी तटबंदी असलेल्या या वाड्याचे काळाच्या ओघात वैभव ओसरले असले तरी एकेकाळी हा वैभवशली वाडा होता. या वाड्यात आजही शंभरपेक्षा अधिक खोल्या आहेत. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान देशभर विखुरलेले पारवेकर कुटुंब या वाड्यात एकत्रित येतात आणि १५ दिवस एकत्र वेळ घालवतात. या वाड्याच्या मागच्या बाजूला परिवारातील दिवंगत सदस्यांचे समाधीस्थळही आहे, अशी माहिती घराण्यातील नवव्या पिढीचे सदस्य सुहास पारवेकर यांनी दिली. पारवा नजीक पहापळ येथेही पारवेकर यांचा देखणा वाडा आहे. हा वाडा ४५० वर्षांपूर्वीचा आहे. सध्या या वाड्याच्या नुतनीकरणाचे काम अण्णासाहेब पारवेकर यांनी हाती घेतले आहे. सध्या पारवेकर कुटुंबाचे कर्तेधर्ते किंवा कुटुंबप्रमुख म्हणून माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर हेच आहेत. पारवेकर कुटुंबातील सदस्यांसाठी आता त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. इतकेच नव्हे तर स्थानिक लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्यासाठीही अण्णासाहेबांचा शब्द अंतिम असतो.
पारवेकर कुटुंबाजवळ आताच्या तेलंगणातील हैद्राबादपासून यवतमाळमधील घाटंजी, कळंब, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरपर्यंत हजारो एकर जमीन होती, असे सांगितले जाते. मात्र नेमकी किती जमीन होती याची माहिती पारवेकर कुटुंबालाही नव्हती. अनेक ठिकाणी कित्येक एकर जमिनीवर आजही मोठमोठे बंगले आहेत. महसूल विभागाकडून ‘तुमची अमुक एकर जमीन तमुक ठिकाणी आहे. त्यावरील कराचा भरणा करा’ अशी स्मरणपत्रे आली की, अमुक शहर-गावात जमीन आहे, हे या कुटुंबाला माहीत होत असे. पारवेकर कुटुंबाकडे १९७४ पर्यंत ६६ हजार एकर जमीन असल्याच्या नोंदी आढळल्या आहेत, असे सुहास पारवेकर यांनी सांगितले. नंतर सिलिंगमध्ये हजारो एकर जमीन गेली. विनोबांच्या भूदान चळवळीला हजारो एकर जमीन दान दिली. अनेक सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, मंदिरे व इतर अनेक गोष्टींसाठीही जमिनी दिल्या. अनेक एकर जमीन कुळांच्या नावावर चढली, असे ते म्हणाले.
पांढरकवडा (केळापूर) आताचा आर्णी विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव होण्याअगोदर येथे पारवेकर घराण्याचीच सत्ता होती. त्यांच्याच घराण्यातील सदस्य आमदार म्हणून निवडून येत असत. कुटुंबातील बाबासाहेब पारवेकर हे परोपकारी व्यक्ती होते. आबासाहेब पारवेकर हे राजकारणात सक्रिय होते. ते आमदार, उपमंत्री होते. पांढरकवडा राखीव असल्याने नंतर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून अण्णासाहेब पारवेकर, पुढे नीलेश पारवेकर व त्यांच्या निधनानंतर काही काळ त्यांच्या पत्नी नंदिनी पारवेकर आमदार राहिले आहेत.
वाडा अनेकांचे दैवत
पारवा येथील मालकांचा वाडा अनेक समाजासाठी दैवत आहे. वाड्यात असलेली साडेतीनशे वर्षांपूर्वीची गणेशाची चांदीची मूर्ती आणि वाड्याच्या प्रवेशदारवर असलेल्या ५०० वर्षांपूर्वीच्या देवीच्या दर्शनासाठी विविध समाजाचे लोक येथे येतात. चैत्र पोर्णिमेला वाड्यात गोंड समाज आपल्या दैवताला गणेशाच्या दर्शनासाठी घेवून येतात. हा पारंपरिक उत्सव अनेक वर्षांपासून सुरू आहे. गावातील प्रत्येक घरातील लग्नाची पहिली पत्रिका आजही वाड्यात दिली जाते.