किती दिवस सहन करायची दादागिरी?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि बांधकाम व कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दादागिरीच्या अनेक तक्रारी होत असताना त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांसह भाजप कार्यकर्तेही मुन्ना यादवांना किती दिवस पाठीशी घालणार? असा सवाल दबक्या आवाजात करू लागले आहेत.
मुन्ना यादव यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना करण यादव आणि अर्जुन यादव अशी दोन मुले असून करण हा यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षांला आहे, तर अर्जुन हा एम.के.एच. संचेती कनिष्ठ महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत आहे. वडील राजकारणी असून त्यांची दहशत असल्याने त्यांची मुलेही आता लोकांसोबत दादागिरी करीत आहेत. २ नोव्हेंबर २०१५ अर्जुन ऊर्फ चिंटू याने आपल्याच वस्तीतील राहुल बुधबावरे याचे अपहरण करून त्याला डांबून मारहाण केली होती. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव यांची पत्नी, मुलगा आणि भावाविरुद्ध गुन्हा नोंदविला, परंतु त्यांना अटक केली नाही. त्याशिवाय चिंटू यादवने २०१४ मध्ये डॉ. आंबेडकर महाविद्यालयासमोरही दोन तरुणांना मारहाण केली होती. त्या प्रकरणातही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही.
मार्च-२०१६ मध्ये मुन्ना यादव यांच्यामार्फत स्थापत्य अभियंता रोशन तेलरांधे याला अपहरणाची धमकी देऊन खंडणी मागण्यात आल्याची ध्वनीफित व्हायरल झाली होती. मात्र, या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकला नाही. १७ फेब्रुवारीला वरुण जांगडे रा. अजनी चौक यांच्या हातावर ब्लेडने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातही मुन्ना यादव यांच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरुणचे काका प्रकाश जांगडे हेही भाजपचे कार्यकर्ते आहेत, तर ६ मे रोजी बांधकाम व्यावसायिक धनराज फुसे यांचा मुलगा योगेश (१७) याला करण ऊर्फ मोंटूने मारहाण केली होती. या प्रकरणातही पोलिसांनी नेहमीप्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आता गेल्या सोमवारी अर्जुनने सागर समुद्रे नावाच्या युवकाशी भांडण करून शिवनगर परिसरात जाऊन तेथे धुमाकूळ घातला. तसेच लोकांना शिवीगाळ केली आणि दमदाटी केली. या प्रकरणातही राणाप्रतानगर पोलिसांनी मुन्ना यादव, त्यांचा मुलगा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अदखलपात्रच गुन्हा दाखल केला.
सीआयडी चौकशीचे काय?
सोनगाव परिसरात सूरज लोलगे यांच्या मालकीचे काही भूखंड आहेत. त्या भूखंडासंदर्भात लोलगे आणि राहुल धोटे व मनीष गुडधे यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान, हा वाद सोडविण्यासाठी धोटे आणि गुडधे यांनी मुन्ना यादव यांच्याशी संपर्क केला. त्यावर मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाला यादव यांनी लोलगे यांना भ्रमणध्वनी करून शिवीगाळ केली. तसेच त्या भूखंडावर सुरक्षा भिंत उभारण्याकरिता व पोलिसांची लफडी सांभाळण्याकरिता २२ लाखांची खंडणी मागितली. त्यावेळी लोलगे याने आपल्या भ्रमणध्वनीमध्ये सर्व संभाषण नोंदवून घेतले आणि त्याची ऑडिओ सीडी तयार करून ४ जुलैला तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी ६ जुलैला गुन्हा दाखल केला. मात्र, वर्ष उलटूनही पोलीस तपास थंडबस्त्यात असल्याने लोलगेने उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात न्यायालयाने सीआयडी चौकशीचे आदेश दिले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस मुन्ना यादव आणि बाला यादव यांचे बयाण नोंदविले, परंतु त्यानंतर तपास कुठपर्यंत आला हे कळायला मार्ग नाही.
किती दिवस अदखलपात्र गुन्हा?
एकच व्यक्ती वारंवार गुन्हे करीत असेल त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात येते. मुन्ना यादव यांची मुले वारंवार लोकांना मारहाण, शिवीगाळ, सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालतात. त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असतानाही प्रत्येक तक्रारीनंतर केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येते आणि सोडून देण्यात येते. हा प्रकार किती दिवस चालणार? यादव कुटुंबीयांना पाठीशी का घालण्यात येते? असे अनेक सवाल सर्वसामान्य नागरिक आणि भाजपमधील अनेक पदाधिकारी करू लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन
मुन्ना यादव हे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आहेत. यादव कुटुंबीयांनी गुन्हा केल्यानंतर प्रत्येकवेळी मुख्यमंत्र्यांचे नाव जोडले जाते. मात्र, असे असतानाही मुख्यमंत्री किंवा त्यांचे गृह खाते यादव यांच्याविरुद्ध काहीच कारवाई करीत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री यादव यांना पाठीशी का घालतात, हे गूढ कायम आहे.
आपल्याविरुद्ध राजकीय कट
आपल्या मुलाचा मित्र अमन टोरिया याला सागर समुद्रे याने पकडून ठेवले होते. आपल्याला माहिती मिळाली तेव्हा अमनला सोडविण्यासाठी तिथे पोहोचलो. त्या ठिकाणी कोणतीही शिवीगाळ केली नाही. तरीही आपल्याविरुद्ध तक्रार दिली. समुद्रे याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून अमन टोरियाच्या प्रकरणात बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वारंवार आपल्या मुलांविरुद्ध तक्रार देऊन आपली बदनामी करण्याचा व आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे.
– मुन्ना यादव, नगरसेवक व बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष.
