दहा लाखांची खंडणीही मागितली; तीन तासांमध्ये आरोपी जेरबंद
रुग्णालयासमोरून एका डॉक्टरचे त्यांच्याच कारमधून अपहरण करून लुटण्यात आले. त्यानंतर डॉक्टरला शस्त्राच्या धाकावर दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. डॉक्टरने धाडस दाखवून खंडणी देण्यास नकार दिल्याने अपहरणकर्त्यांनी इतवारी परिसरात एका गल्लीत रात्रीच्या अंधारात सोडून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच सक्करदरा व गुन्हे शाखा पोलिसांनी तीन तासांत आरोपींना पकडले.
डॉ. केदार शरद जोशी (५०) रा. नरकेसरी ले-आऊ ट, जयप्रकाशनगर असे अपहृत डॉक्टरचे नाव असून त्यांचे उमरेड मार्गावरील मिरची बाजार परिसरात डॉ. जोशी स्कॅन सेंटर नावाने एक्स-रे व सोनोग्राफीचे केंद्र आहे. याप्रकरणी प्रीतम ऊर्फ जुगनू ज्ञानेश्वर वानखेडे (३०) रा. संजय गांधीनगर व त्याचा साथीदार रोशन अशोक राऊ त (३०) रा. न्यू सुभेदार लेआऊ ट या दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
आठ वर्षांपूर्वी जुगनू हा जोशी यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करीत होता. पैसे चोरत असल्याने जोशी यांनी त्याला कामावरून काढले होते. जोशी यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाऊ शकते, असे जुगनू याने रोशनला सांगितले. शुक्रवारी रात्री दोघांनी डॉ. जोशी यांच्या अपहरणाचा कट आखला. शनिवारी दोघेही जोशी यांच्या पाळतीवर होते. रात्री १० वाजताच्या सुमारास जोशी सोनोग्राफी सेंटरमधून बाहेर आले. त्यांनी एमएच ४९, बी ३७०२ या क्रमांकाच्या कारच्या मागील बाजूला फाईल ठेवत असताना रोशनने त्यांना धक्का मारून कारच्या सिटवर पाडले. शस्त्राच्या धाकावर त्यांना डांबून जुगनू याने जोशी यांच्या हातातील कारची चाबी हिसकावली. दोघे जोशी यांना घेऊ न दीड तास शहरात फिरले. त्यानंतर जोशी यांना शांतीनगर परिसरातील एका निर्जन स्थळी नेले. ठार मारण्याची धमकी देऊ न दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. एवढे पैसे नसल्याचे जोशी यांनी दोघांना सांगितले. त्यानंतर दोघांनी चाकूचा धाक दाखवून जोशी यांच्या गळ्यातील सोनसाखळी, बोटातील अंगठय़ा व ४० हजारांची रोख असा एकूण एक लाखाचा ऐवज हिसकावला. जोशी यांना कारमध्येच सोडून पसार झाले. काही वेळाने जोशी हे धक्क्यातून सावरले. घरी परतले. नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सक्करदरा पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला.
सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित सिद, उपनिरीक्षक डी. एम. राठोड, संजय सोनवणे, आनंद जाजुर्ले, राशिद शेख, मनोज ढोले, दीपक तऱ्हेकर, संदीप, पवन, रोहन व योगेश यांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र तपासले असता जुगनू याने साथीदाराच्या मदतीने अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. सक्करदरा पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आधी जुगनू व नंतर रोशन याला अटक केली. त्यांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्रकार परिषदेला पोलीस निरीक्षक अजित सिद उपस्थित होते.
असा गुन्हा उघडकीस आला
या अपहरणासाठी आरोपींनी डॉक्टरच्याच कारचा वापर केला. त्यामुळे आरोपींचा शोध घेणे आव्हानात्मक होते. पण, पोलिसांनी आरोपींनी डॉक्टरांना सोडल्यानंतर कुठे जाऊ शकतात, याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला. अंधारात स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये व्यक्तीचा चेहरा स्पष्टपणे टिपला जात नाही. पण, दोघेजण चालताना बघितले असता एकजण लंगडत चालताना दिसला. जुगनूला पोलियो असून त्याच्या पायात रॉडही टाकण्यात आला असून तो लंगडत चालतो, असे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हा उघड झाला. दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत.