अकोला : गत काही वर्षांमध्ये पश्चिम विदर्भातील ‘शैक्षणिक हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्ह्याची बारावीच्या निकालात मात्र मोठी घसरण झाली आहे. अमरावती विभागात बारावीच्या परीक्षा निकालात अकोला जिल्ह्याचा ८४.२८ टक्के निकाल लागला. अकाेला जिल्हा विभागात तळाशी आहे. बारावी परीक्षेच्या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली. ८९.८८ टक्के मुली, तर ७९.२१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा घसरलेला निकाल चिंताजनक ठरत आहे. अकोला शहरात अनेक नामांकित शिकवणी वर्गाचे मोठे जाळे आहे. स्थानिकसह अनेक जिल्ह्यांमधून येथे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात.

शिकवणी वर्गाच्या संचालकांनी मोठे प्रस्थ निर्माण केले. मात्र, गेल्या एक ते दोन वर्षांपासून अकोल्यातील शिक्षण क्षेत्राला उतरली कळा लागली आहे. त्याचे प्रतिबिंब बारावी परीक्षेच्या निकालात उमटले. बारावीच्या निकालात अकोला जिल्ह्याची मोठी घसरण झाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २़०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. अकोला जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी एकूण २४ हजार ५३३ अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २४ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

यातील ८४.२८ टक्के म्हणजेच २० हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये १० हजार १६५ मुले, तर १० हजार ४३९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ९२.१९ टक्के निकाल पातूर तालुक्याचा लागला. अकोला ८६.६८, अकोट ७७.९५, तेल्हारा ८६.९७, बार्शिटाकळी ८७.०४, बाळापूर ७६.५९ व मूर्तिजापूर तालुक्याचा ७६.१३ टक्के निकाल लागला आहे.

दरम्यान, अकोल्यातील श्री. रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयाचा ९३.९६ टक्के निकाल लागला. महाविद्यालयातून प्रथम क्रमांक अर्जुन सुनील ठाकरे ८९.३३ टक्के, द्वितीय प्रियंका राजेश गावंडे ८८.३३ टक्के तर तृतीय क्रमांक संस्कृती चंद्रकांत आसटकर ८७.३३ टक्के गुण प्राप्त केले.११३ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. गुणवंत विद्यार्थ्यांचा दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.राजेश चंद्रवंशी, वरिष्ठ प्राध्यापक जे. टी. जाधव, वरिष्ठ प्राध्यापिका खोडकुंभे व प्रा.अंभोरे आदी उपस्थित होते.