लोकसत्ता टीम
बुलढाणा: मराठा आरक्षणाचे कडवे विरोधक असलेल्या वादग्रस्त वकिलाच्या उलट्या पुतळ्यामुळे बहुचर्चित ठरलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील साखळी उपोषणची आज सांगता करण्यात आली. याशिवाय जिल्ह्यातील इतर ठिकाणची आंदोलने देखील मागे घेण्यात आली. अंतिम टप्प्यात रिपाइं ( आठवले) ने केलेले धरणे आंदोलन कौतुकाची बाब ठरली.
मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषणाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळाले. बहुतेक आंदोलने सकल मराठा समाज च्या पुढाकाराने करण्यात आली. यात सत्ताधारी वगळता इतर पक्ष सहभागी झाले. बुलढाण्यात भाजपचा सहकारी असलेल्या रिपाइं आठवले गटाने ३ नोव्हेंबर ला जिल्हा कचेरीसमोर स्वतंत्र धरणे आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला. एखादया राजकीय पक्षाने केलेले हे जिल्ह्यातील एकमेव आंदोलन ठरले. यामुळे ते सकल मराठा समाजाच्या कौतुकास पात्र ठरले.
आणखी वाचा-वायू प्रदूषणामुळे “ब्रेस्ट कॅन्सर” चा धोका
दरम्यान बुलढाण्यातील सकल मराठा बांधवांच्या साखळी उपोषणाच्या मंडपाला कट्टर विरोधक असलेल्या वादग्रस्त वकिलांचा उलटा पुतळा लटकविण्यात आला होता. हा पुतळा लक्षवेधी ठरला. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याने बुलढाण्यासह खामगाव, मलकापूर, मेहकर, जळगाव जामोद, लोणार, सुलतानपूर आदी ठिकाणची आंदोलने देखील आज मागे घेण्यात आली.