चंद्रपूर: नागपंचमी निमित्त हंगामी व्यवसायाच्या दृष्टीने चंद्रपूर येथून लाह्या, वटाणे, फुटाणे व इतर पूजेचे साहित्य खरेदी करून मोटर सायकलने आपल्या स्वगावी भद्रावती तालुक्यातील मुरसा येथे परत येत असताना मागाहून येणाऱ्या एका कारने दिलेल्या जोरदार धडकेत पती व पत्नी गंभीर जखमी झाले. नंतर उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील साखरवाही फाट्या जवळील ताडाळीच्या सीडीसीसी बँक जवळ  घडली. भद्रावती तालुक्यातील मूर्सा निवासी सुभाष पुंडलिक कामतवार (४५) तर गिरजा सुभाष कामतवार (४२) असे मृत दांपत्याचे नाव आहे.

नेहमीच ग्रामीण भागात हंगामी व्यवसाय करणारे हे दाम्पत्य नेहमीप्रमाणे नागपंचमीच्या पर्वावर व्यवसाय करण्यासाठी लाह्या, नारळ, वाटाने,फुटाणे व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी चंद्रपूर येथे गेले होते.ठोक विक्रेत्याकडून विक्रीचे साहित्य खरेदी करून आपल्या मोटर सायकल ने आपले मूळ गाव मूरसा कडे जात असताना चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील साखरवाही फाट्याजवळील  ताडाळीच्या चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या  समोर मागून येणाऱ्या (कार क्र. एमएच १५ जेडी १०९६) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

 यात सुभाष व त्यांची पत्नी गिरजा हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना चंद्रपूरच्या कोल सिटी या खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने  त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना केले. मात्र या दरम्यान त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित केले. त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत दाम्पत्य भोई समाजाचे असून त्यांच्या पश्र्च्यात २ मुले,१ मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या या मृत्युमुळे मुर्सा या गावात शोककळा पसरली. विशेष म्हणजे मागील वर्षी ३१ डिसेंबरला याच समाजाच्या आजी, आजोबा आणि नातीचा याच महामार्गावरील भद्रावतीच्या डॉली पेट्रोल पंप जवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता.