अमरावती : मला सोडून जावू नको, अशी वारंवार विनंती करूनही त्याला न जुमानणाऱ्या पत्नीची पतीने झोपेतच कुऱ्हाडीने हल्ला चढवून हत्या केली. ही धक्कादायक घटना तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीतील कामनापूर घुसळी येथे घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

लता मधुकर कातलाम (५५) असे मृत महिलेचे तर मधुकर नारायण कातलाम (६०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कामनापूर घुसळी येथील रहिवासी मधुकर याला अर्धांगवायूने अपंगत्व आले होते. त्यामुळे उतारवयात माझा सांभाळ कोण करणार, तू मला सोडून जावू नकोस, अशी विनवणी त्याने पत्नी लता यांना केली. मात्र, पती मधुकर याचे न ऐकता लता यांनी या वयात त्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी मधुकर याच्याकडे एक व्यक्ती आली होती. त्याने तुमचा उपचार करतो, असे म्हणून मधुकर व लता यांना तालुक्याच्या ठिकाणी त्याच्या घरी नेले. दवाखान्यातील काम आटोपल्यावर मधुकरला त्या व्यक्तीचे घर सापडले नाही. त्यामुळे तो आपल्या घरी परतला. तर लता ह्या त्या व्यक्तीकडे राहिल्या.

हेही वाचा…वर्धा : भाच्याची समजूत काढणे पडले महागात, एकाच ठोश्यात मामा…

दरम्यान, शनिवार, २२ जून रोजी अचानक लता ह्या कामनापूर घुसळी येथील आपल्या घरी परतल्या. त्यावेळी मला न सांगता तू कुठे गेली होती? इतके दिवस कुठे होती? अशी विचारणा मधुकरने लता यांच्याकडे केली. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. बुधवारी रात्री अचानक लता यांनी मधुकरला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मी दुसऱ्याशी लग्न करणार आहे व यापुढे मी तुझ्यासोबत राहू शकत नाही, असे लता यांनी पती मधुकरला सांगितले. या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. मी अर्धांगवायूने ग्रस्त आहे, माझ्याकडे कुणी लक्ष देणारे नाही, मी एकटा राहील, माझे काय होईल, असे म्हणत मधुकरने पत्नी लता यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा…नागपूरसह संपूर्ण विदर्भात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, लता यांनी त्याचे काहीही न ऐकता आपले साहित्य व कपडे बॅगमध्ये भरून जाण्याची तयारी केली. त्यामुळे संतापलेल्या मधुकरने लता यांना संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मध्यरात्रीनंतर मधुकरने गाढ झोपेत असलेल्या लता यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. त्यामध्ये लता यांचा जागीच मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार सकाळी उजेडात आल्यावर गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी तळेगाव दशासर पोलिसांना दिली. माहिती मिळताच ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मधुकर हा लता यांच्या मृतदेहाजवळच बसून होता. त्याने घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगून हत्येची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मधुकरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.