गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वडसा – अर्जुनी मार्गावर अर्जुनीलगत असलेल्या  तावशी फट्यावर एक विचित्र अपघाताची घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. यात भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नीचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. मुखरू जीवन नाकाडे (वय ६२) आणि मालता मुखरू नाकाडे (वय ५७) रा. टोला कोरंभी तालुका अर्जुनी मोरगाव अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, मृतक नाकाडे दांपत्ये अर्जुनी मोरगाव येथे आपल्या नातेवाईकाकडे नवरात्र दुर्गा पूजा निमित्त असलेली कथा आटोपून स्वगावी जाण्यासाठी निघाले असता अर्जुनी मोरगावच्या बाहेर तावशी टी पॉईंट जवळ समोरून वडसा अर्जुनी मार्गे टोमॅटो भरून जात असलेल्या ट्रक क्रमांक एपी ३७ टिके १५८९ च्या चालकाने समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की या धडकेत दुचाकी हिरो स्प्लेंडर क्रमांक एम एच ३५ एम ६३०१ दुचाकी चालक मुखरू नाकाडे व त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मालता नाकाडे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी मृत्युच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलिसांनी घटना स्थळ गाठून प्रकरणाची नोंद करून , पंचनामा करून ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

या घटनेत मुखरु नाकाडे व मलाता नाकाडे यांचा मृत्यू झाला. ” दोघेही पती-पत्नी नातेवाईकाकडे कथेच्या जेवणाला आले होते. कथा कार्यक्रम आटोपून निघाले असता समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला मात्र मृतक मुखरू नाकाडे यांच्या डोक्यावरून ट्रक गेल्याने डोका पुर्णतः चेंदामेंदा झाल्याची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांनी दिली. अपघात ग्रस्त दुचाकी ट्रक मध्ये अडकून असल्याने ट्रक चालकांना पळता आलं नाही. लागलीच माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना मिळताच अर्जुनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून दोन्ही मृतकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पोहोचवले. ट्रक चालकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार  मृतक मुखरू जीवन नाकाडे (वय ६२) आणि मालता मुखरू नाकाडे  दांपत्यांना तीन मुली व एकुलता एक मुलगा आहे. तीनही मुलींचे लग्न आटोपले असून नुकताच एका मुलाचा साक्षगंध कार्यक्रम रविवार २८ सप्टेंबर रोजी लवारी येथे पार पडला. पुढे मुलाच्या लग्नाचा आनंदाच्या क्षणात आला असतांना एकाच शरणावर  दोघांनाही अग्नी देण्याची दुःखद तेवढीच दुर्दैवी वेळ मुलावर आली या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले असून टोला कोरंभी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.