नागपूर : ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उठवत असल्याने मला लक्ष्य करण्यात आले, असा आरोप काँग्रेसमधून निलंबित आशीष देशमुख यांनी त्यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना केला आहे. कोणतेही सबळ कारण नसताना कारणे दाखवा नोटीस बजावणे दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी मी कटिबद्ध आहे, भाजपाने ओबीसी आउटरीच कार्यक्रमाची योजना आखली आहे, दुसरीकडे काँग्रेसला ओबीसींबद्दल कोणतीही चिंता वाटत नाही. प्रदेश काँग्रेस अध्यक्षांशी संबंधित ‘खोका’ या माझ्या विधानाचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तथापि, त्याचा अर्थ काढण्याचे काम मी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांवर सोडतो. त्यांनी माझ्या सूचनेचा ज्याप्रमाणे अर्थ काढला, तसा ते या मुद्याचाही काढू शकतात, असे देशमुख यांनी उत्तरात स्पष्ट केले.

हेही वाचा – नागपुरात वज्रमूठ सभेवर वादाचे सावट! मैदानाच्या मुद्द्यावरून भाजपा-काँग्रेसमध्ये तनाव

हेही वाचा – ठाकरे गटाच्या आमदाराने काढली भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची औकात; आमदार नितीन देशमुख म्हणाले, “तो मतिमंद असलेला माणूस..”

ओबीसींच्या कल्याणासाठी आवाज उठवत असल्याने मला लक्ष्य करण्यासाठी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. माझ्या विरोधातील मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे आणि नेत्यांच्या कार्यशैलीबाबत प्रश्न विचारण्याचे माझे धाडस हे त्याचे कारण आहे. मला नोटीस बजावून, प्रदेश काँग्रेसने आपल्याच लोकशाहीवादी परंपरेचा अपमान केला, असा आरोप डॉ. देशमुख यांनी केला.