नागपूर : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इंडिया ऑफ (आयसीएआय) तर्फे सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल, सीए इंटरमिजिएट आणि सीए फाऊंडेशन परीक्षांचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले.
नागपूर शाखेच्या विद्यार्थ्यांनी या सर्व परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शहराचा गौरव वाढविला आहे. सीए फायनल परीक्षेत साहिल मोती मोटवानी याने चमकदार कामगिरी केली आहे. त्याला पहिल्या ग्रुपमध्ये २१२ व दुसऱ्यात २१४ असे एकूण ४२६ गुण मिळाले आहे. त्याचबरोबर हर्षिता पालीवाल हिने ३८८ गुणांसह , सिद्धी अग्रवाल हिने ३७६ गुणांसह , वत्सल सहस्त्रबुद्धे याने ३७५ गुणांसह आणि कार्तिक असवानी याने ३६३ गुणांसह चमकदार कामगिरी केली आहे.
आयसीएआय नागपूर शाखेमार्फत ९९५ विद्यार्थ्यांनी सीए फाऊंडेशनची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आदिल विनोदकुमार हस्सानी याने ३०० गुणांसह, निखिल चौधरी याने २८३ गुणांसह आणि अंबर आचार्य याने २७७ गुणांसह चमकदार कामगिरी केली.
सीए इंटरमिजिएटच्या दोन्ही गटांत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये तनिषा चौरेसिया हिने ४०५ गुणांसह पहिले स्थान पटकावले आहे. तिच्यापाठोपाठ सौम्या मोदी हिने ४०४ गुणासह दुसरे, द्विंकल सिंह ३९७गुण घेत तिसरे, ध्रुव पटेल ३८९ गुण मिळवून चौथे व पूनम हेडाऊ हिने ३८१ गुण पाचवे स्थान पटकाविले आहे.
नागपूरमधून एकूण ३८२ विद्यार्थ्यांनी सीए इंटरमिजिएटच्या दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३७ जण उत्तीर्ण झाले.
माझी बहीण सीए आहे, तिच्यापासूनच मला प्रेरणा मिळाली. पुढे मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करणार आहे. त्यानंतर प्रॅक्टिसचा विचार करेल. -साहिल मोटवानी.
माझे कुटुंब व्यावसायिक असल्याने मला सीएचे महत्त्व माहीत होते. त्या दृष्टिकोनातूनच मी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढचे शिक्षण घेतले. आता पुढे नोकरी की प्रॅक्टिस अजून ठरवायचे आहे. -कार्तिक असवानी
