शिवसेनेने शांततेच्या मार्गाने व संयमाने हा विषय हाताळल्यास शिवसेनेचे ५० टक्के आमदार स्वगृही परततील, असा विश्वास पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी व्यक्त केला.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीने शिवसेनेत फुट पडली आहे. त्यामुळे शिवसेना कार्याध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा विषय संयम व शांततेने सोडविणे गरजेचे आहे. शांततेच्या मार्गाने किमान ५० टक्के आमदार स्वगृही परतू शकतात, असे सांगत गुवाहाटीतील बंडखोर शिवसेना आमदारांना परत पक्षात येण्याचे आवाहन धानोरकर यांनी केले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार चालवले. मात्र, आता अचानक असे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करत यामागे भाजपाचा हात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या बंडखोर आमदारांना काँग्रेस राष्ट्रवादीची साथ नको असेल, तर आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ. मात्र, भाजपाला रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे खासदार धानोरकर म्हणाले. बंडखोर शिवसेना आमदारांच्या कार्यालयांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. समेट व्हायला हवा, नाहीतर दरी वाढून वेगळे वळण मिळेल.”, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मातोश्री’च्या काम करण्याच्या पद्धतीवर स्तुतीसुमने उधळली –

भाजपाच्या स्थानिक नेत्यांसोबत जमत नव्हते म्हणूनच काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असे सांगत धानोरकर यांनी मातोश्रीच्या काम करण्याच्या पद्धतीवर स्तुतीसुमने उधळलीत. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराविरोधात उघड भूमिका घेतली होती. आता ताज्या संकटात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हे सरकार चालले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी लावून धरली आहे.