यवतमाळ : जिंतूरच्या (जि. परभणी) भाजप आमदार व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (साकोरे) यांचे नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची अवैध विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या ट्रकमधून आणलेली दारू अवैध विकताना पुसद शहर पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
पुणे येथील विश्वास इंटरप्राइजेस आणि ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ट्रक (एमएच १२, वायबी ००४८) हा पुणे येथील हडपसरमधून ४० लाख रुपये किमतीची ‘ग्रीन लेबल’ ही दारू घेऊन नागपूरकडे जात होता. एनडीजे लिक्विड्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही दारू पोहचवायची होती. मात्र, ट्रकचालक नागपूरकडे न जाता पुसद शहरात पोहोचला. येथे माहूर मार्गावर एका मोकळया ठिकाणी ट्रक उभा करून दारू विक्री करू लागला. तीन दुचाकींवरून आलेल्या सहा तरुणांनी सहा पेट्या दारू खरेदी केली. पुसद पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी मनीष ईश्वरू सुरुळे (१९, रा. वाडी नामदार, ता. पैठण, जिल्हा संभाजीनगर, हल्ली मुक्काम कारेगाव, पुणे), राजेश्वर मधुकर पवार (२३), सचिन उद्दल चव्हाण (२३), सचिन सावन चव्हाण (२४), गोकुळ बाबूसिंग चव्हाण (२३), विक्रम बळीराम जाधव (२०) सर्व रा. तुळशीनगर ता. महागाव आणि प्रवीण दत्ताजी जोहरे (३०), रा. वाई गौळ, ता. मानोरा, जि. वाशीम यांना ताब्यात घेतले.
या वाहनावर ‘राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे बोर्डीकर’ असे ठळकपणे लिहिले आहे. ट्रकमालक कोहकाडे हे राज्यमंत्री बोर्डीकर यांचे नातेवाईक असल्याची माहिती चालकाने दिली. त्यांना चौकशीसाठी बोलावल्याचे पुसद शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी सांगितले. हा ट्रक बुधवारीच नागपूर येथे पोहचणे अपेक्षित होते. मात्र गोकुळ चव्हाण याच्या माध्यमातून चालकाने तो पुसद येथे आणून दारू विकण्याचा प्रयत्न केला. या दारूच्या सर्व पावत्या, कर भरणा आदी कागदपत्रे योग्य असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. मात्र, यातील दारूच्या १० पेट्या चालकाने अवैधपणे विकल्या. पैशांची गरज असल्याने हा प्रकार केल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. या कारवाईत पोलिसांनी ४० लाखांची दारू, ट्रक, तीन दुचाकी, सात मोबाईल असा ६४ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
मेघना बोर्डीकर यांच्याकडून प्रतिसाद नाही
यासंदर्भात प्रतिक्रिया मिळवण्यासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या स्वीय सचिवांनाही संदेश पाठवून प्रतिक्रिया मागितली. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही.