लोकसत्‍ता टीम

अमरावती : पत्नीचे अनैतिक संबंध आणि तिने सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे मानसिक तणावात आलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत तरूणाच्या आईच्या तक्रारीवरून पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहित तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ नोव्हेंबर २०२३ रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणी त्याच्या आईने मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आपल्या मुलाच्या पत्नीचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. ती मनाप्रमाणे आपल्या नातवाला घरी ठेवून बाहेर जात होती. मनाला वाटेल तेव्हा घरी परत येत होती. याबाबत मुलाने तिला काही म्हटल्यास ती त्याच्याशी वाद घालत होती. तर तिचा प्रियकर हा आपल्या मुलाला धमकावत होता.

आणखी वाचा-“एकतरी मागासवर्गीय खुल्या निवडणुकीतून…”, राजकीय आरक्षणावरून जितेंद्र आव्हाडांचा परखड सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या मुलाने पत्नीला पैशांबाबत विचारणा केल्यावर तिने त्याच्याशी वाद घातला. या वादात तिने आपल्या मुलाला परिसरातील लोकांसमोर लाथ मारून खाली पाडले. त्याला मारहाण करून पाठीला चावासुद्धा घेतला. त्यानंतर ती घरून निघाली गेली. या घटनेनंतर आपला मुलगा हा मानसिक तणावात होता. पत्नीचे अनैतिक संबंध, तिने केलेली मारहाण तसेच तिच्यासह प्रियकराच्या त्रासाला कंटाळूनच आपल्या मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी मृताची पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.