* मुंबईचे आयुक्त आय.एस. चहल यांची सूचना

* चाचण्या, विलगीकरण, उपचार या त्रिसूत्रीवर भर

करोनाच्या वाढता प्रभाव रोखण्यासाठी तपासणी करणे, विलगीकरण आणि आवश्यक वैद्यकीय उपचाराची यंत्रणा बळकट करणे, या त्रिसूत्रीवर मुंबईत या आजाराचा उद्रेक नियंत्रणात आणता आला. याप्रमाणे नागपूरमध्येही झोननिहाय वॉर रूम  तयार करून  एकछत्री समन्वयातून वरील त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करीत करोना प्रतिबंध शक्य आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा, अशी सूचना बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल यांनी शुक्रवारी येथे केली.

नागपूर शहर व ग्रामीण भागात वाढत असलेली बाधितांची संख्या बघता मुंबईतील धारावी व कोळीवाडा येथील करोना उद्रेक ज्या पद्धतीने नियंत्रणात आणला, त्याच पद्धतीने उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी चहल उच्चस्तरीय तज्ज्ञ मंडळासह शुक्रवारी नागपुरात दाखल झाले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर व  जिल्हा प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या पथकात डॉ. हेमंत शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुजल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांचा सहभाग होता. चहल यांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करून काही सूचना केल्या.

या बैठकीत झोननिहाय नियुक्त करण्यात आलेल्या सनदी अधिकारी वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालक माधवी खोडे, खनिकर्म विभागाचे राममूर्ती, विदर्भ वैधानिक महामंडळाच्या सदस्य मनीषा खत्री यांनी गेल्या काही दिवसातील त्यांची निरीक्षणे सादर केली व सूचना मांडल्या.

१ हजार ९६६ नवीन रुग्ण, ३९ बाधितांचा मृत्यू

शुक्रवारी एकाच दिवशी १ हजार ९६६ करोना बाधितांच्या नव्या उच्चांकाची नोंद झाली. दिवसभरात पुन्हा ३९ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात आजवर ३६ हजार ३९८ करोनाबाधित झाले असून मृत्यूची एकूण संख्या १ हजार २१६ वर पोहचली आहे.  गुरुवारपासून सर्व बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता बाजारात पूर्वीप्रमाणे गर्दी उसळत असून त्यावर प्रशासनाचे कोणतेच नियंत्रण नाही. परिणामी,  रुग्णांची संख्या वाढली आहे  नव्या रुग्णांपकी २०९ ग्रामीण तर १ हजार ७५६ शहरातील असून एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या ३५ हजार पार करून ३६ हजार ३९८ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस मृत पावलेल्यांची संख्याही वाढत असून दिवसभरात एकूण ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ५ रुग्ण हे ग्रामीणचे तर ३३ शहरातील आहेत, १ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. याशिवाय दिवसभरात १ हजार २२८ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६.२६ टक्के आहे.

तज्ञ्ज समितीच्या सूचना

करोना नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या समितीने खालील सूचना केल्या. त्यात चाचण्यांची संख्या वाढवणे, गंभीर रुग्ण, संशयित रुग्ण यांच्यासाठीच फक्त अँटिजेन चाचणीचा वापर करावा, रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे, खासगी असो वा सरकारी प्रत्येक रुग्णालयात  वॉर रूम सुरू केली पाहिजे, गंभीर रुग्णाच्या उपचाराबाबतचे प्रत्येक दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये साठवले गेले पाहिजे, प्रत्येक बाधितांचे विश्लेषण झाले पाहिजे, बेडची उपलब्धता ऑनलाईन पद्धतीने करणे आदींचा समावेश आहे.

पोलिसांच्या उपचारासाठी हवे स्वतंत्र रुग्णालय

शहर पोलीस दलाभोवती करोनाचा  विळखा अधिकच घट्ट होत असून शुक्रवारी ३० च्यावर पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाली असून आता पोलिसांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय हवे, अशी मागणी जोर धरत आहे.  उपराजधानीतील जवळपास ९०० पोलिसांना करोनाची लागण झाली असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे सहा पोलीस  शिपाई दगावले आहेत. गंभीर असलेल्या पोलिसांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. पण, सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करण्यासाठी प्रतीक्षा असून अनेकदा वेळेवर उपचार न  मिळाल्याने रुग्ण दगावू शकतो.  शेकडो पोलिसांना आज रुग्णालयात उपचार घेण्याची आवश्यकता आहे. अनेक खासगी रुग्णालयांशी चर्चा केल्यानंतर रुग्ण दाखल करण्यात येत नाही. त्यामुळे पोलिसांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस  विभागातून उमटत आहे.

अधिकाऱ्यांनी बाहेर पडावे

धारावी आणि मुंबईतील अन्य भागांमध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष झोपडपट्टीमध्ये जाऊन उपाययोजनांची पाहणी केली. त्यामुळे यंत्रणेत सुधारणा करता येते. नागपुरात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी अधिक वाढवाव्या, असे आवाहनही चहल यांनी यावेळी केले.

महापालिकेने योग्य  निर्णय घ्यावा

पोलिसांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय असावे, याचा प्रस्ताव पोलीस  विभागाकडून महापालिकेला अनेक  दिवसांपूर्वी सादर करण्यात आला आहे. अनेक पोलिसांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात उपचार घेण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता स्वतंत्र रुग्णालयाची आवश्यकता असून महापालिकेने पोलिसांच्या प्रस्तावावर  निर्णय घ्यावा.

– गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त, मुख्यालय.

एसटी आगारात करोनाचा शिरकाव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन माहमंडळ (एसटी) च्या घाट रोड येथील एनआर एक या आगारात वाहनात डिझेल भरणारा कर्मचारी करोना सकारात्मक आला आहे. मात्र त्याच्या संपर्कात आलेल्यांची अजूनही करोना चाचणी झालेली नाही, अशी माहिती पुढे आली आहे.