लोकसत्ता टीम

चंद्रपूर : ५० वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्याचे मराठीमध्ये ‘गॅझेटीअर’ तयार होत आहे. मात्र, या ‘गॅझेटीअर’वर भूगोल अभ्यासक प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे, प्रा. डॉ. सचिन वझलवार यांनी आक्षेप घेत त्यातून जिल्ह्यातील समाजसुधारक, इतिहास संशोधक, पर्यावरण, साहित्य, सामाजिक, राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांची नावे वगळल्याचे म्हटले आहे. सोबतच जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या नोंदींचाही यात समावेश नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान, आक्षेप घेण्याच्या २४ सप्टेंबर या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ १२ जणांनीच आक्षेप नोंदवले आहेत.

जिल्ह्याचे १९०८, १९७२ नंतर तिसरे ‘गॅझेटीअर’ मराठीमध्ये तयार करण्यात आले आहे. हे ‘गॅझेटीअर’ जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकाशित करण्यात आले असून त्यावर आक्षेप व हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रा. डॉ. दुधपचारे, खगोल अभ्यासक प्रा. चोपणे, प्रा. डॉ. वझलवार यांनी आक्षेप नोंदवले. ‘गॅझेटीअर’मध्ये जातींची पुरेशी माहिती नाही. साहित्य क्षेत्रातील लहानात-लहान व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. मात्र, इतिहास संशोधक अ.ज. राजूरकर, टी.टी. जुलमे, दत्ताजी तन्नीरवार यांच्यावर केवळ दोन ओळीच आहेत. तसेच वन्यजीव व पर्यावरण क्षेत्रातील बंडू धोतरे यांच्यासह इतरांची नावे वगळण्यात आली आहेत. नागपूर येथे स्वातंत्र्य चळवळीत मॉरिस कॉलेजवर ध्वज फडकवणारे ॲड. राजेश्वरराव हुड यांच्या नावाचाही समावेश नाही. न्यायमूर्ती हिरपूरकर, स्व. शांताराम पोटदुखे, ॲड. पारोमिता गोस्वामी, माजी आमदार स्व. ॲड. एकनाथराव साळवे, मोरेश्वर टेमुर्डे, आजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, स्व. शंकरराव देशमुख यांच्याही नावाची ‘गॅझेटीअर’मध्ये नोंद नाही.

आणखी वाचा-केदारनाथ धामचे गोंदियात दर्शन! जांगळे कुटुंबीयांनी साकारला केदारनाथ मंदिराचा देखावा

‘गॅझेटीअर’मध्ये जिल्ह्यातील या महानुभावांची तसेच प्रमुख मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारे, राजवाडे, किल्ले यांचीही नोंद घेण्यात यावी. इरई नदी व झरपट नदीची सविस्तर माहिती देण्यात यावी, जिल्ह्याचे सरासरी तापमान, स्वातंत्र्य सेनानी, गोवा मुक्ती संग्राम सेनानी, राजुरा मुक्ती संग्राम सेनानी, स्वतंत्रता सेनानी, वीर बाबुराव शेडमाके यांच्या नोंदी नाहीत. शास्त्रज्ञ, संशोधक, वैज्ञानिकांची माहिती, जिल्ह्यातील सर्वांत जुनी ब्रिटिशकालीन ज्युबिली शाळेची माहितीचा यात समावेश नाही. जिल्ह्यातील स्वातंत्र्यकाळापासून कार्यरत असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांची नावेही यात समाविष्ट नाही. जुन्या ‘गॅझेटीअर’मधील अनेक बाबी, जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी, नोंदी गाळण्यात आल्या असून त्यांची सविस्तर नोंद घ्यावी, अशी अपेक्षा व हरकती त्यांनी नोंदवल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवार २४ सप्टेंबर हा आक्षेप नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत केवळ १२ जणांनीच आक्षेप नोंदवला असल्याची माहिती आहे.