चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाचे नागपूर शाखाध्यक्ष सुरेन दुरगकर यांची माहिती; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी करचुकवेगिरी कशी करायची याचा सल्ला मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, सध्याचे कडक लायदे लक्षात घेता करचुकवेगिरी करणाऱ्यांना आता सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंटस्) देखील वाचवू शकणार नाहीत. आयकर विभागाकडून प्रत्येक व्यवहाराची मॅपिंग होत असून त्याचे ‘डिजिटल अ‍ॅनलिटिक्स’ होत असल्याने करचुकवेगिरी आता अशक्य झाली आहे, अशी माहिती दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियाच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष सुरेन दुरगकर यांनी दिली. लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छ भेटीदरम्यान ते बोलत होते.

दुरगकर म्हणाले, आयकर विभागाकडे सर्वाच्या उत्पन्नाचा हिशोब आहे. संपत्ती वाढल्यास त्याचा स्रोत काय, एवढा पसा कुठून आला आणि तो कुठे खर्च केला, व्यवसाय काय, गेल्यावर्षी व्यवसायातील उत्पन्न किती होते, ते वाढले असेल तर अचानक कसे वाढले, हे सर्व तुम्हाला सिद्ध करावे लागते. संशय आल्यास आयकर विभागाकडून लगेच मिसमॅचची नोटीस बजावण्यात येते. आयकर विभागाकडून संगणकीय विश्लेषण होत असल्याने पळवाट नाहीच. कुणी आयकरमधून सुटलाच तर पुढे जीएसीमध्ये पकडला जातो. प्रत्येक ठिकाणी फेरतपासणी होते. आयकरच्या काद्यानुसार परतावा भरताना पासपोर्ट, व्हीसा क्रमांक सर्व स्पष्ट नमूद करावे लागते. त्यामुळे आता करचुकवेगिरी सोडून उत्पन्न वाढवण्याकडे लोकांचा कल दिसत आहे.

जो कोणता नवीन बदल घडतो तो पचवायला किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. जीएसटी कायद्याचेही तसेच आहे. मात्र, एकदा कायदा कळला की नंतर मात्र पुढे काहीच अडचण येत नाही. नागरिकांनी आपल्या जाहीर केलेल्या उत्पन्नातूनच खर्च करावा.  सीए कधीच चुकीचे सल्ले देत नाहीत. आमच्याकडे आलेल्यांना आम्ही त्यांच्या उत्पन्नातून खर्च दाखवायला सांगतो.

आयकरच्या कचाटय़ात आल्यास पुढे नाहक त्रास सहन कारावा लागतो. जास्तीत जास्त लोकांनी कर भरावा हाच आमचा प्रयत्न असतो. देशाच्या आर्थिक विकासाकरिता कर भरणे गरजेचेच आहे, याकडेही दुरगकर यांनी लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांसाठी वर्षभर कार्यक्रम

नागपुरात अडीच हजार सनदी लेखापाल तर नऊ हजार सनदी लेखापालचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आमची संस्था वर्षांला तीनशेवर एज्युकेशन प्रोग्राम आयोजित करते. सीएचा सर्वागीण विकास व्हावा, हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश आहे. यामध्ये जीएसटी, आयकर कायदा, कंपनी लॉ, तंत्रज्ञान याबद्दल माहिती दिली जाते. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना आम्ही बोलावतो. देशात आमच्या अनेक शाखा आहेत. मात्र, नागपूरची शाखा अग्रक्रमांकावर आहे. देशपातळीवरील पुरस्कार  बहुतांश वेळा नागपूर शाखेला मिळाले आहेत.

सनदी लेखापाल होताच काम मिळण्याची खात्री 

गेल्यावर्षी  अभ्यासक्रम पूर्ण करून १६८ सनदी लेखापाल तयार झाले. त्यापकी एकही रिकामा नाही. प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले आहे. हा व्यवसाय पूर्वीच्या तुलनेत मोठा झाला आहे. तसेच नव्याने विविध क्षेत्र तयार झाल्याने सनदी लेखापालांना अनेक संधी प्राप्त झाल्या आहेत. पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने कार्य करायचो. मात्र आता बँक कोड आले, वस्तू व सेवा कर आले त्यामुळे काम मिळण्याची खात्री वाढली आहे. जीएसटीमध्ये तर सनदी लेखापालासाठी कामाचा अभाव नाही. लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात केवळ उत्पादन व्हायचे. मात्र, आता रोजगार क्षेत्रालाही त्यामध्ये टाकण्यात आल्याने सनदी लेखापालांचे काम वाढले आहे. आयटी आणि उत्पादनाचे क्षेत्र नागपुरात विस्तारले तर येथील सनदी लेखापालांना मुंबई-पुणे येथे जाण्याची गरज पडणार नाही, असेही दुरगकर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impossible for anyone to defraud anyone due to harsh law
First published on: 27-04-2019 at 00:41 IST