अकोला : शहरातील कृषी नगर भागात दोन गटातील वादातून हवेत गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. तलवारीने परस्पर हल्ला करण्यात आला. यामध्ये आठ जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. वर्चस्वाच्या लढाईतून दोन गट आमने-सामने आल्यानंतर हा संघर्ष घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोला शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय असून त्यांच्यामध्ये वर्चस्वासाठी टोळीयुद्ध भडकत असल्याचे चित्र दिसून येते. शहरातील कृषी नगरात गुरुवारी रात्री याचाच प्रत्यय आला. दोन गटात मोठा वाद झाला. वर्चस्वाच्या लढाईतून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या वादामध्ये तलवारीसह बंदुकीचाही वापर झाल्याची माहिती आहे. या वादात दोन गट आमने-सामने भिडले. तुंबळ हाणामारीमध्ये आठ जण जखमी झाले.
या वादाची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून दोन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले. एक राऊंड हवेत गोळीबार झाला. या घटनेतील जखमींना उपचारासाठी तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. कृषी नगर परिसरात दहशतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
कृषी नगरात आकाश गवई आणि संतोष वानखडे या दोन गटात वर्चस्वाच्या लढाईतून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वानखडे यांच्या राहत्या घरावर हल्ला चढवत या वादाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये धुसफूस सुरू होती. याचे रूपांतर आज मोठ्या हल्ल्यात व हाणामारी झाले. या वादामध्ये सुमारे १५ पेक्षा अधिक आरोपींचा समावेश असल्याचे कळते. या घटनेनंतर कृषी नगरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी करून पोलीस आरोपींची ओळख पटवत आहेत. आरोपींच्या शोधात पोलिसांची पथके विविध दिशेने रवाना झाली. आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.