अकोला : शेगाववरून अकोल्याकडे येणाऱ्या शिवशाही बसला गुरुवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर आग लागल्याची घटना घडली. बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने ४४ प्रवाशांचे प्राण वाचू शकले. या आगीत बस संपूर्णत: जळून खाक झाली. या घटनेमुळे शिवशाही बसच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. अकोला आगार क्रमांक दोनची शिवशाही बस क्रमांक एमएच ०९ इएम १७९२ प्रवाशांना घेऊन आज सकाळी शेगांव येथे गेली होती. शेगांव येथून ४४ प्रवासी घेऊन परतीच्या मार्गावर असलेली विनावाहक बस रिधोरा गावानजीक आली असता बसमध्ये तांत्रिक अडचण आली. चालकाच्या कक्षामध्ये बसला आग लागली. हेही वाचा : यवतमाळ: धक्कादायक! गाढ झोपेत असलेल्या बाप-लेकास विषारी सापाचा दंश बसचालक पी. एन. डोंगरे यांनी प्रसंगावधान राखत बस थांबवली. त्यांनी प्रवाशांना वेळीच घटनेची माहिती देऊन बसमधून सर्वांनी उतरण्यास सांगितले. चालक डोंगरे यांनी अग्निशामक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. काही क्षणांमध्ये संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकाने घटनास्थळावर धाव जळत्या बसवर पाण्याचा मारा केला. आगीवर नियंत्रण मिळवले. चालकाच्या सतर्कतेमुळे ४४ प्रवाशांचा जीव वाचला. पाण्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजापूर लघू प्रकल्पात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधकार्य पथकाला आज मिळाला. अंत्री मलकापुर येथील रहिवाशी सुरज दिलीप शेगोकार (३१) हे गावाजवळ असलेल्या कारंजा रमजापुर लघू प्रकल्पाच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडाले. मागील दोन दिवसापासून शोधकार्य सुरू होते. शोध व बचाव पथकास आज त्यांचा मृतदेह आढळला. तहसीलदार वैभव फरतारे यांच्या मार्गदर्शनात संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे दीपक सदाफळे यांचे पथक, नया अंदुरा येथील राजु डाबेराव यांचे पथक, तलाठी प्रशांत बुले, राजपूत यांनी शोधकार्य राबवले. हेही वाचा : खळबळजनक! संतनगरीत बालकाचे अपहरण करून हत्या; मृतदेह पोतडीत…बुलढाणा जिल्हा लागोपाठच्या घटनांनी हादरला सर्व ‘पीएचसी’मध्ये आता ‘मन:शक्ती’ अकोला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत मन:शक्ती क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना मानसिक आजाराविषयी काही लक्षणे दिसून आल्यास अशा रुग्णांवर प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत औषधोपचार करण्यात येतात. आवश्यकतेनुसार ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित केले जाते. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तज्ज्ञांमार्फत मानसिक आजाराविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमात चार हजार ७७७ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.