अकोला : सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तामिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्यासह महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात द्वेषपूर्ण वक्तव्याचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी हिंदुत्ववाद्यांकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सनातन धर्माची ‘डेंग्यू’, ‘मलेरिया’, ‘करोना’, ‘एड्स’ आणि ‘कुष्ठरोग’ आदी रोगांशी तुलना करून सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा द्रमुक पक्षाचे तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, काँग्रेस पक्षाचे कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तामिळनाडूचे द्रमुक पक्षाचे खासदार ए. राजा यांनी केली होती. त्याचप्रमाणे पत्रकार निखिल वागळे यांनीही त्याला सहमती दर्शवत सनातन धर्म हा एखाद्या रोगासारखा आहे, अशी द्वेषपूर्ण पोस्ट समाजमाध्यमांमध्ये केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ‘सनातन धर्म म्हणजे देशाला लागलेली कीड आहे’, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.

हेही वाचा : अकोला : रेल्वेची प्रवाशांना आणखी एक भेट; दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्याही धर्माविषयी अशोभनीय, निंदा करणारे वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावणे, तसेच द्वेष पसरवणे, घृणा निर्माण करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्‍यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात अजून कुठे तक्रार दाखल झाली आहे का? याचा तपास करून यासंबंधी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले. ही तक्रार देताना विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व धर्मप्रेमी उपस्थित होते.