अमरावती: एका विवाहित महिलेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अविवाहित तरुणाला तिने ऐनवेळी लग्नास नकार दिला. त्यामुळे प्रेमभंग झालेल्या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी मृताच्या आईच्या तक्रारीवरून संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने एक चिठ्ठी लिहून ठेवली असून आपल्या मृत्यूसाठी ती महिलाच कारणीभूत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

श्याम नरेश खडके (२८) रा. अंजनगाव सुर्जी असे मृताचे नाव आहे. तक्रारीनुसार, श्यामचे आरोपी विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. श्याम हा अविवाहित होता. गेल्‍या काही दिवसांपासून श्यामने तिच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र, आधीच विवाहित असल्याने तिने त्याला ते शक्य नसल्याचे सांगत लग्नास नकार दिला. प्रेमभंग झाल्याने श्याम हा निराश झाला. प्रेमात वेडा झालेल्या श्यामने मानसिक तणावातून वडाळी मार्गावरील शेतशिवारात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळाल्यावर अंजनगाव सुर्जी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व श्याम खडके याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा… शेगावात पन्नास हजारांवर भाविक! साप्ताहिक सुट्या व एकादशीचा योग; भाविकांमुळे विदर्भ पंढरी फुलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास आरंभला. पोलिसांना श्यामने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली एक चिठ्ठीही आढळून आली. लग्नास नकार देण्यात आल्याने आपण आत्महत्या करीत असून त्यासाठी सदर महिलाच कारणीभूत असल्याचे त्याने त्यात नमूद केले आहे. या प्रकरणी मृतक श्यामच्या आईची तक्रार व चिठ्ठीवरून पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.