अमरावती : कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्‍या विविध मागण्‍यांसाठी काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या नेतृत्‍वात गुरुवारी येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात आला. शासनाविरोधात घोषणाबाजी करीत दुपारी हा मोर्चा इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्‍यासह मोठ्या संख्‍येने काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

उन, पाऊस, थंडी, वादळ वारा यांचा विचार न करता शेतकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करून अन्नधान्य पिकवतो. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी शेती करणे थांबविल्यास जनजीवन उदध्वस्त होईल. शेतकरी जगला तरच जग जगेल, त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आपण सातत्याने लढत राहू असे आमदार यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : गडचिरोली : अधिकारी, कंत्राटदार मालामाल; लोकप्रतिनिधी हैराण? निकृष्ट रस्त्यांमुळे…

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणात एकवाक्यता नाही. शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी सुध्दा केलेली नाही. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी व अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले, परंतु याची मदत देखील अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक विमा काढला. मात्र ,यातील ५० टक्‍के शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमच मिळाली नाही. अलीकडे मोठ्या आर्थिक लाभाच्या योजना शासन जाहीर करीत आहे. जुन्या योजनांचे पैसे मात्र रोखून ठेवले आहेत. आजही निराधार योजना, आवास योजना यांचा निधी शासन स्तरावर रखडलेला आहे. त्यामुळे कित्येकांची घरकुल अर्धवट आहेत. कित्येक लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम सुरू केले. परंतु, निधीअभावी ते रस्त्यावर आले आहेत. चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. मात्र, मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली.

हेही वाचा : रेशन दुकानांच्या रांगेत ‘लाडक्या बहिणी’, कारण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आंदोलनात सुधाकर भारसाकळे, हरिभाऊ मोहोड, बाळासाहेब हिंगणीकर, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, रामेश्वर अभ्यंकर, सतीश हाडोळे, श्रीकांत गावंडे, गिरीश कराळे, राम चव्हाण, दिलीप काळबांडे, दयाराम काळे, प्रदीप देशमुख, अरुण वानखडे, प्रवीण मनोहर, रवी पटेल, मुक्कदर खाँ पठाण, समाधान दहातोंडे, प्रकाश चव्हाण, गुणवंत देवपारे, अमोल होले, निशिकांत जाधव, मन्ना दारसिंबे, विनोद पवार आदी सहभागी झाले होते.