अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अरण्यानजीक वसलेल्या आदिवासींच्या वस्त्यांमध्ये कधी वाघाचा तर कधी बिबट्याचा शिरकाव झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात.

दरम्‍यान, मासे विकून मोटरसायकलने आपल्‍या गावी परत जात असलेल्‍या आदिवासी युवकावर दबा धरून बसलेल्‍या वाघाने हल्‍ला केला. यात त्‍याचा मृत्‍यू झाला. चिखलदरा तालुक्‍यातील खोंगडा बीट अंतर्गत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विनोद छोटेलाल चिमोटे (३५, रा. केली, ता. चिखलदरा), असे वाघाच्‍या हल्‍ल्‍यात ठार झालेल्‍या युवकाचे नाव आहे. विनोद याचा मासेविक्रीचा व्‍यवसाय होता. विनोद हा काल जामली आर येथे मासे विकण्यासाठी आला होता. काल रात्री आठ ते नऊच्या सुमारास एमएच २७ / बीजे ९०५९ क्रमांकाच्‍या मोटरसायकलने तो आपल्या गावाकडे केली येथे परत जात असताना वाघाने त्‍याच्‍यावर हल्‍ला केला, त्‍यात त्‍याचा मृत्‍यू झाला.

त्‍याचा मृतदेह रात्रभर मुख्य रस्त्यापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर जंगलात पडून होता. त्याच्या शरीराचे लचके वाघाने तोडल्‍याचे स्पष्टपणे दिसून आला. वन विभागाच्‍या कर्मचाऱ्यांना आज सकाळी त्‍याचा मृतदेह आढळला. वनविभागाचे कर्मचारी सकाळी जंगल गस्तीवर असताना त्यांना रस्‍त्‍यावर मोटरसायकल दिसली. यावरून त्यांना संशय आला. नंतर त्यांनी शोध सुरू केला. काही अंतरावर जंगलामध्ये युवक मृतावस्‍थेत दिसून आला. त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली तसेच चिखलदरा पोलिसांना दिली.

त्यानंतर विभागीय वन अधिकारी यशवंत बहाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल, चिखलदराचे पोलीस निरीक्षक प्रशांत मसराम यांच्‍यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. त्याचा मृतदेह शवविच्‍छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोटरसायकल आढळल्‍याने शोध

आज सकाळी आमचे वनरक्षक प्रदीप धांडे व कर्मचारी जंगल वस्तीवर असताना त्यांना एक मोटरसायकल दिसून आली यावरून त्यांना संशय आला. त्यांनी शोध घेतला असता वन खंड क्रमांक ९५२ मध्ये खोंगडा बीट अंतर्गत विनोद छोटेलाल चिमोटे (वय ३५ रा. केली) या युवकाचा मृतदेह आढळून आला. त्‍याच्‍या शरीराचा भाग वन्‍य प्राण्‍याने खाल्लेला असावा, असे दिसून आले. वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मोबदला देण्यात येईल. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल यांनी दिली.