अमरावती: शेतकरी, शेतमजूर, वंचित घटकांच्‍या विविध मागण्‍यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्‍वात बुधवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बच्चू कडू स्वतः सत्तेत सहभागी असताना आपल्याच सरकार विरोधात विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्‍यात आल्‍याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

संत गाडगेबाबा यांच्‍या समाधीस्‍थळापासून दुपारी मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात मोठ्या संख्‍येने प्रहारचे कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी कडक पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. गाडगेनगर, इर्विन चौक मार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्‍त कार्यालयावर पोहचला. शेतीची पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतून व्हावीत, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना महात्‍मा फुले प्रोत्‍साहन अनुदान योजनेअंतर्गत ५० हजार रुपये अनुदान जाहीर करण्‍यात आले होते, पणअजूनही शेतकऱ्यांना त्‍याचा लाभ मिळाला नाही.

हेही वाचा… बापरे! सेट टॉप बॉक्समध्ये विद्युत प्रवाह, चिमुरड्याचा स्पर्श होताच…..

त्‍यामुळे तो तत्‍काळ मिळावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसानभरपाई मिळावी, वन्‍य प्राण्‍यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, जीवितहानी यासाठी नुकसानभरपाई त्‍वरित मिळावी, वन्‍य प्राण्‍यांचा बंदोबस्‍त करावा, प्रकल्‍पग्रस्‍तांना २५ लाख रुपये अनुदान, २० लाख रुपये बिनव्‍याजी कर्ज अथवा कुटुंबातील एका सदस्‍याला शासकीय नोकरी द्यावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावे यासह विविध मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आल्‍याचे बच्चू कडू यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मागण्यांवर सकारात्मक विचार करतील अशी आशा आहे. मोर्चा म्हणजे सरकारचा विरोध नाही, तर चळवळ आहे, असे बच्‍चू कडू यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा… फडणवीस सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री, मग स्वातंत्र्यदिन सोहळ्यात कुठे लावणार हजेरी? झेंडावंदनावरून सर्वत्र उत्सुकता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना आजही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्‍ती, शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे बळीराजा संकटात आहे. त्‍याचप्रकारे कष्‍टकरी, कामगार, सामान्‍य ना‍गरिक, दिव्‍यांग, यांचीही हीच परिस्थिती आहे. यामुळे जनसामान्‍यांच्‍या मागण्‍या घेऊन क्रांतीदिनी हा मोर्चा काढण्‍यात आल्‍याचे प्रहारच्‍या कार्यकर्त्‍यांनी सांगितले.