अमरावती : दुसरी मुलगी झाल्यापासून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ चालवला. या सततच्या छळाला कंटाळून आरोग्य विभागात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील जयभोले येथे उघडकीस आली. याप्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीवरुन बँक व्यवस्थापक पतीसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच ही घटना उजेडात आल्याने कौटुंबिक छळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शुभांगी नीलेश तायवाडे (३२) रा. जयभोले कॉलनी, तपोवन, अमरावती, असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभांगी यांचा पती नीलेश अंकुरराव तायवाडे (३५), भासरा नितीन तायवाडे (३८), भाचा नयन रामटेके (२५) यांच्यासह सासू व नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी नीलेश तायवाडे, सासू व नणंदेला रविवारी दुपारीच अटक करण्यात आली.
समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून होत्या कार्यरत
शुभांगी या धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चिंचपूर उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत होत्या. शुभांगी यांचे माहेर नागपुरातील हिंगणा भागातील आहे. शुभांगी यांचा विवाह सेंट्रल बँकेत व्यवस्थापक असलेल्या नीलेश तायवाडेसोबत सहा नोव्हेंबर २०२१ रोजी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत.
दरम्यान, शुभांगी यांचे वडील राजेंद्र तुरकाने (६५) रा. हिंगणा, नागपूर यांच्या तक्रारीनुसार लग्नानंतर काही दिवसांनीच नीलेशने पत्नी शुभांगीला त्रास द्यायला सुरुवात केली. शुभांगीला दुसरी मुलगी झाल्यानंतर पतीसह सासरच्या मंडळींचा त्रास आणखी वाढला. मागील काही दिवसांपासून पती नीलेश हा तिला सातत्याने नोकरी सोडण्यासाठी आग्रह करीत होता. मात्र, शुभांगी नोकरी सोडण्यास तयार नव्हती.
चारित्र्यावर संशय
२४ मे रोजी सायंकाळी शुभांगीचा मला शेवटचा कॉल आला. त्यावेळी ती अत्यंत निराश असल्याचे जाणवत होते. पती नीलेशसह सासरचे लोकं वारंवार भांडण करतात. पती चारित्र्यावर संशय घेतो. त्यांना या घरात मी नकोशी झाली आहे, असेही तिने त्यावेळी मला सांगितले. त्यावेळी आम्ही तिला समजाविले. मात्र, रविवारी सकाळी शुभांगीच्या पतीच्या मोबाइलवरून शेजारी राहणाऱ्या महिलेचा कॉल आला. शुभांगीने गळफास लावला आहे, असे त्यांनी मला सांगितले. पती व सासरच्या मंडळीने दिलेल्या त्रासामुळेच मुलगी शुभांगीने आत्महत्या केली, असे त्यांनी तक्रारीत नमुद केले आहे.