अमरावती : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही अमरावती हे आजोळ आहे. या ठिकाणी जर जातीय राजकारणाची प्रयोगशाळा केली जात असेल, तर ते योग्य नाही. किरीट सोमय्या हे कुठल्या पदावर आहेत. आजी-माजी खासदार अनेक जण असतात. पण, किरीट सोमय्या यांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गोंधळ घालण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल करीत काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी सोमय्या यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, किरीट सोमय्या कोण आहेत. निवडणुका आल्या की यांना जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे उद्योग सुचतात. त्यांची नाटके आता अजिबात सहन केली जाणार नाहीत. किरीट सोमय्यांच्या माध्यमातून सरकार हे प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे बरोबर नाही. हे पूर्णपणे निषेधार्ह आहे. या ठिकाणी एकही रोहिंग्या घुसखोर सापडलेला नाही, तरीही गोंधळ घालणे सुरू आहे. हे अमरावती जिल्ह्यातील जातीय सलोख्याच्या वातावरणासाठी हे चांगले नाही. महाराष्ट्रात, देशात सौहार्दाचे वातावरण टिकून राहिले पाहिजे. जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला. गेल्या दहा वर्षांपासून भाजपच सत्तेत आहे. देशात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे. त्यांची यंत्रणा काय करीत आहे, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला.

खासदार बळवंत वानखडे म्हणाले, किरीट सोमय्या हे वारंवार अमरावतीत येऊन प्रशासनावर दबाव टाकत आहेत. खोटे जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप करीत आहेत. रोहिंग्यांना मोठ्या प्रमाणावर दाखले दिले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. पण, जिल्ह्यात एकही रोहिंग्या नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अमरावतीत जातीय सलोख्याचे वातावरण आहे. पण, या ठिकाणची शांतता बिघडविण्याचे काम किरीट सोमय्या हे करीत आहेत. खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणत आहेत.

या संपूर्ण गोंधळात प्रशासनाने सर्व धर्मीयांच्या मुलांचे जन्मदाखले वितरीत करणे थांबवले आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदी वेळेवर होत नसल्याचे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांची यामुळे प्रचंड अडचण होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या संपूर्ण प्रकारासाठी किरीट सोमय्या यांचा अट्टाहास कारणीभूत आहे, अशी टीका बळवंत वानखडे यांनी केली.