अकोला: जेवणाच्या ताटावर बसला असताना घरगुती वादातून राग अनावर झाला. त्याच रागाच्या भरात पत्नीसह तीन वर्षीय चिमुकलीची गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना तारफैल भागात शनिवारी दुपारी घडली. दुहेरी हत्याकांड घडल्याने शहर हादरले. घटनेनंतर आरोपीने पत्नी व सावत्र मुलीच्या तोंडात शेवटचा घास देखील भरवल्याचा हृदयद्रावक प्रकार घडला. आरोपीने स्वतःच पोलिसांना घटनेची माहिती दिली.

डोक्यात राग गेला की माणसाच्या हातून काय कृत्य होईल, हे सांगता येत नाही. वारंवार होणाऱ्या कौटुंबिक वादातून अनेकवेळा टोक गाठले जाते. रागाच्या भरात काही क्षणातच मोठा अनर्थ घडतो. याच प्रकारची एक धक्कादायक घटना अकोला शहरात शनिवारी घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. शहरातील तारफैल भागात सूरज गणवीर उर्फ गोट्या राहत होता. त्याने दुसरे लग्न केले होते. दुसरी पत्नी अश्विनी हिला पहिल्या पतीपासून तीन वर्षांची मुलगी होती.

कौटुंबिक कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमीच खटके उडत होते. शनिवारी दुपारी सूरज जेवण करण्यासाठी घरी आला असताना दोघांमध्ये टोकाचे वाद झाले. जेवणाच्या ताटावर बसले असतानाच कौटुंबिक वादातूनच आरोपी पतीने पत्नी अश्विनी गणवीर (२७) आणि तीन वर्षांची सावत्र मुलगी आरोही यांचा गळा आवळून हत्या केली. या घटनेची माहिती आरोपीनेच पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा मृत्यू

शहरातील उड्डाणपुलावर दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. संतोष वनवासी (२०) असे मृतकाचे नाव आहे. तरुण दुचाकीने (क्र. एमएच ३० पी ४४६९) उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जात होता. दुचाकी घसरल्याने तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखा व रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतक तरुण हा मुळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी होता. कामाच्या निमित्ताने तो अकोल्यात आला होता. शहरात पाणीपुरीच्या गाडीवर तो कामाला होता.