भंडारा : रील्स बनवण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावल्याच्या घटना समोर येत असतानाच भंडारा जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. बारावीच्या एक विद्यार्थी रील बनवण्यासाठी पाण्यात उतरला आणि बुडाला. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अनेक जण रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायला तयार आहेत. स्वतःच्या जीवाशी खेळत आहेत याचेही त्यांना भान नसते. भंडारा जिल्ह्यातील कोंढा कोसरा परिसरातही अशीच एक दुर्दैवी घटना घडली काल घडली. रविवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास तीर्थराज धनपाल बरसागडे (१८) हा विद्यार्थी त्याच्या दोन मित्रांसोबत सीनेगावला लागून असलेल्या कोंढा कोसारा परिसरातील मुरुम खदान येथे गेला होता. या ठिकाणी रिल बनवण्याचा मोह त्याला आवरला नाही. तो पाण्यात उतरला. त्याने त्याच्या मित्रांना मोबाईलवरून रील बनवण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितले.
झाडावरून तीर्थराजने पाण्यात उडी मारली, पण काही क्षणातच तो पाण्यात बुडाला आणि दृष्टीआड झाला. मित्र पाण्यात बुडाला हे लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी ताबडतोब गावात फोन करून अपघाताची माहिती दिली. ही बातमी मिळताच गावकरी आणि तीर्थराजचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनाही बोलावण्यात आले आणि खूप प्रयत्नांनंतर तीर्थराजचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेह अड्याळ ग्रामीण रुग्णालयात शवविछेदनासाठी पाठवण्यात आला. तीर्थराज बरसागडे हा अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील सोनेगावचा रहिवासी होता आणि तो बारावीचा विद्यार्थी होता. मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.